शहरात कबुतरे आणि पारव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी या पक्ष्यांचे थवे दिसत असून, हौशी पुणेकर त्यांना खायला टाकत असतात. मात्र, कबुतरांमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होत असल्याने अखेर कबुतरांना खाद्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. याचबरोबर दंडात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे. विशेष म्हणजे कबुतरांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना करावयाच्या, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय पक्षी अहवाल २०२३ नुसार, देशात कबुतरांची संख्या २००२ ते २०२३ या कालावधीत तब्बल १५० टक्क्यांनी वाढली. सर्वच पक्ष्यांमध्ये कबुतरांची संख्या वाढण्याचा वेग अधिक आहे. कबुतरांनी मानवी अधिवासाशी जुळवून घेत इमारतींच्या सांदीकोपऱ्यात घरटी बनवून राहणे स्वीकारले आहे. याचबरोबर मानवाकडून पुरेसे खाद्य त्यांना उपलब्ध होत असल्यानेही शहरी भागात त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता ही वाढलेली संख्या कमी कशी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कबुतरांमुळे हायपरसेन्सिटिव्ह न्यूमोनायटिससह श्वसनविषयक आणि फुफ्फुसाचे गंभीर आजार होत असल्याची बाब वारंवार अधोरेखित केली जाते. विशेषत: कबुतरांची विष्ठा आणि त्यांच्या अंगावरील धूळ हे अनेक रोगांचे वाहक बनतात. एक कबुतर वर्षाला १२ ते १५ किलो विष्ठा करते. त्यातून त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या धोक्याची कल्पना यावी. हा देखणा पक्षी जीवघेणा ठरू लागल्याने त्यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

कबुतरांची संख्या कमी करावयाची, तर त्यांना मारण्यास कायदेशीर बंदी आहे. त्यामुळे कोणतीही शासकीय यंत्रणा हे काम करू शकत नाही. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला त्यामुळे अखेर नागरिकांनीच कबुतरांना खाद्य टाकू नये, असे आवाहन करावे लागले. कबुतरांच्या समस्येवर इतर महापालिका काय उपाययोजना करीत आहेत, याबाबत पुणे महापालिकेने सर्व महापालिकांना पत्रे पाठविली होती. विशेष म्हणजे एकही महापालिका यासाठी उपाययोजना करीत नसल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली. राज्यात केवळ पुणे आणि ठाणे या महापालिकांनी कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यावर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

जगभरात कबुतरांची संख्या वाढल्यानंतर त्यांना मारण्याचा उपाय केला जातो. मात्र, कालांतराने त्यांची संख्या पुन्हा वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्राणी व पक्षी संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ संस्थेने याला विरोध दर्शवित कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचविले आहेत. सार्वजनिक ठिकाणी कबुतरांसाठी एकत्रित घरटी तयार करून तिथे कबुतरांना खाद्य उपलब्ध करून द्यावे. या ठिकाणी कबुतरे त्यांची अंडी घालतील. ही अंडी काढून घ्यावीत अथवा त्या जागी बनावट अंडी ठेवावीत. त्यामुळे कबुतरांची संख्या नियंत्रणात राहील. त्याचबरोबर कबुतरांचे खाद्य कमी करावे. खाद्य कमी झाल्यास कबुतरे आपोआप त्यांची संख्या नियंत्रणात आणतात. एक कबुतर वर्षात ४ ते ६ वेळा अंडी घालते. एका वेळेला किमान दोन पिले जन्माला येतात. खाद्याचा पुरवठा कमी झाल्यास कबुतरे वर्षाला एकदा अथवा दोनदाच अंडी घालू शकतील. त्याचबरोबर खाद्याची टंचाई असेल, तर कबुतरे पिलांना जन्म देणे टाळतील. यातून त्यांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल, असे ‘पेटा’चे म्हणणे आहे. युरोपमधील अनेक देशांत हा प्रयोग यशस्वी होत आहे. पुण्यातही हा प्रयोग महापालिकेने करायला हरकत नाही; मात्र, कबुतरांना खाद्य टाकणे टाळून पुणेकरांनी या प्रयत्नांना साथ द्यायला हवी. अन्यथा पुणेकर स्वत:च्याच आरोग्याला गंभीर धोका निर्माण करतील.

sanjay.jadhav@expressindia.com

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Massive increase in the number of pigeons and doves pune print news stj 05 amy