लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘मूलतत्त्ववादामुळे बांगलादेशातील नागरिक भारतात घुसत आहेत. आतापर्यंत जे काही समोर आले आहे, ते हिमनगाचे टोक आहे. बांगलादेशातून प्रचंड प्रमाणात घुसखोरी होत आहे,’ असा दावा केंद्रीय शिक्षण आणि ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनी शुक्रवारी केला. ‘घुसखोरी रोखण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. मात्र, राज्य सरकारकडून जे सहकार्य मिळायला हवे, ते मिळताना दिसत नाही,’ अशी टीकाही त्यांनी केली.
पुण्यात एका खासगी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी डॉ. मजुमदार शुक्रवारी पुण्यात आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पश्चिम बंगालमधील परिस्थिती चिंताजनक आहे. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूच नाही, तर ख्रिश्चनांवरही अत्याचार होत आहेत. बांगलादेश आणि भारत यांच्यातील पश्चिम बंगाल येथील सीमा कुंपणाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे बांगलादेशातून घुसखोरी होत आहे. त्यामुळे भारतातील अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होत आहे,’ असे ते म्हणाले.
आणखी वाचा-‘राजगुरूनगर’प्रकरणी आरोपीला कोठडी, ग्रामस्थांकडून बंद; आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
मजुमदार म्हणाले, ‘आमचे सरकार येण्यापूर्वीचे लोक ईशान्य भारतात केवळ जाऊन यायचे. आमचे सरकार आल्यावर तत्कालीन पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी वारंवार ईशान्य भारताचे दौरे केले. आधी आसाममध्ये सतत बॉम्बस्फोट व्हायचे. आम्ही तेथील आक्रमक गटांशी सातत्याने चर्चा केली. शांतता निर्माण झाल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही आधी शांतता निर्माण करण्यावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५४ मंत्रालयांच्या एकूण आर्थिक अंदाजपत्रकाच्या दहा टक्के खर्च ईशान्य भारतासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.
आता उद्योगांना गुंतवणुकीसाठी ईशान्य भारतात आणण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यक्रम करण्यात येत आहेत. या माध्यमातून अनेक सामंजस्य करार होऊन ईशान्य भारतात गुंतवणूक होत आहे. अलीकडेच टाटा समूहाने मायक्रोचिप निर्मितीचा उद्योग गुवाहाटीजवळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ईशान्य भारताची आर्थिक ताकद वाढण्यास मदत होईल. ईशान्य भारताचे संपूर्ण चित्र बदलून जाईल. ईशान्य भारताच्या क्षमतेचा अद्याप वापर झालेला नाही. जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्यासाठी ईशान्य भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे, तेथे गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे.’
आणखी वाचा-भंगार दुकानातील कॉम्प्रेसरच्या स्फोटात कामगाराचा मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू
मणिपूरवर चुप्पी
‘कायदा आणि सुव्यवस्था हा गृह खात्याचा विषय आहे. माझ्याकडे ईशान्य भारताच्या विकासाचे काम आहे. माझ्या खात्याचा निधी कसा वापरला जाईल, याकडे लक्ष देणे माझे काम आहे. त्यामुळे मणिपूरसंदर्भात बोलण्यासाठी मी योग्य व्यक्ती नाही,’ असे सांगून सुकांत मजुमदार यांनी मणिपूरमधील स्थितीवर बोलण्याचे टाळले.