सह्य़ाद्रीच्या भव्य पर्वतांवर वसलेले व बहरलेले नयनरम्य पर्यटनस्थळ, थंड हवा, गर्द झाडी, लालमातीच्या पायवाटा, खोल दऱ्या अशी अनेक वैशिष्टय़े असलेल्या माथेरानमध्ये ‘वीकएन्ड’ व्यतिरिक्त अन्य दिवशीही अधिकाधिक पर्यटक आकर्षित व्हावेत, या हेतूने सुरू केलेल्या माथेरान महोत्सवाची तसेच माथेरान या स्थळाविषयी पिंपरी-चिंचवडकरांना सविस्तर माहिती व्हावी म्हणून बुधवारी चिंचवडमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
माथेरान प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय सावंत व पिंपरीचे माजी महापौर संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. रामकृष्ण मोरे नाटय़गृहात २४ एप्रिलला चार वाजता जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे आहेत. खासदार गजानन बाबर, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे आदी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी, सकाळपासून ‘माथेरान, जसे आहे तसे’ हे छायाचित्रांचे प्रदर्शन पाहता येणार आहे. या वेळी ‘माथेरान भूषण’ व ‘माथेरान मित्र’ पुरस्कारांचे वितरण होणार असून ‘जांभूळ आख्यान’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे.
सावंत म्हणाले, २० ते २८ मे दरम्यान माथेरानला महोत्सव होणार आहे, तेथे औद्योगिकनगरीचा पर्यटक माथेरानला यावा, असा प्रयत्न आहे. पहिल्या महोत्सवानंतर पाण्याचा प्रश्न सुटला. नंतर, रेल्वे शटल सुरू झाली. आता पाचगणीच्या धर्तीवर बोर्डिंग स्कूल सुरू करावी, अशी मागणी आहे. या ठिकाणी माथेरानची माहिती विविध स्टॉलद्वारे दिली जाणार आहे.
 माथेरानच्या डोंगरावरून मावळ ‘लक्ष्य’
मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीतर्फे लढण्यासाठी संजोग वाघेरे तीव्र इच्छुक आहेत. गेली अनेक वर्षे शहराच्या राजकारणात प्रभाव टिकवून असलेल्या वाघेरेंना लोकसभेच्या तयारीसाठी ‘खालच्या’ भागात पोहोचायचे आहे. त्यामुळे महोत्सवाचे आयोजन शहरात करण्यात आले. वाघेरेंचा मित्र परिवार, जय गोविंदा ग्रुप तसेच भिकू वाघेरे प्रतिष्ठानच्या सहकार्याने त्यांनी महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात, पत्रकारांनी विचारले, तेव्हा आताच काही सांगता येणार नसल्याचे सांगून थेटपणे भाष्य करण्याचे त्यांनी टाळले.