महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाहपदाचा प्रा. मिलिंद जोशी यांनी दिलेला राजीनामा परिषदेच्या कार्यकारिणीने मंजूर केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असल्याची माहिती परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पत्रकारांना दिली. प्रा. जोशी यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर अपेक्षेप्रमाणे प्रकाश पायगुडे यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड करण्यात आली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या गोवा येथे झालेल्या बैठकीनंतर प्रा. जोशी यांनी प्रमुख कार्यवाहपदाचा राजीनामा दिला. वैयक्तिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ झाली असल्याने आपण हा राजीनामा देत असल्याचे जोशी यांनी सांगितले. मात्र, गोव्यातील या बैठकीमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षांच्या नावे बनावट मजकूर आणि खोटी स्वाक्षरी असलेले पत्र सादर केल्यामुळे जोशी यांचा राजीनामा घेतला असल्याचे डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी सांगितले. प्रकाश पायगुडे यांच्याकडे तात्पुरती प्रमुख कार्यवाहपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या २५ मे राजी होणाऱ्या बैठकीमध्ये पायगुडे यांची महामंडळाच्या प्रमुख कार्यवाहपदाची औपचारिक घोषणा होईल.
या पाश्र्वभूमीवर रविवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये डॉ. शेजवलकर यांनी याविषयीच्या घटनाक्रमाची माहिती सभासदांना दिली. त्यांनी केलेल्या निवेदनानंतर कोणत्याही स्वरूपाची प्रश्नोत्तरे झाली नाहीत. पूर्वनियोजित कार्यक्रमाला जाण्यासाठी शेजलवकर निघून गेल्यानंतर कार्यकारिणीने प्रा. जोशी यांचा राजीनामा मंजूर केला आणि प्रमुख कार्यवाहपदी प्रकाश पायगुडे यांची निवड केल्याचे माधवी वैद्य यांनी सांगितले. पायगुडे यांच्याजागी डॉ. कल्याणी दिवेकर यांची कार्यवाहपदी निवड करण्यात आली. तर, शहर कार्यकारिणी सदस्यपदी प्रा. रूपाली शिंदे यांची निवड करण्यात आली.
प्रा. जोशी यांनी राजीनामा दिला की तो घेतला गेला या प्रश्नावर डॉ. वैद्य म्हणाल्या, परिषदेकडे त्यांचा राजीनामा आलेला आहे. हा राजीनामा मंजूर झाल्यामुळे आमच्या दृष्टीने या प्रकरणावर पडदा पडला आहे.
प्रमुख कार्यवाह दुसऱ्यांदा बदलला
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सलग दुसऱ्या कार्यकारिणीमध्ये प्रमुख कार्यवाह बदलला गेला आहे. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या कार्यकारिणीमध्ये डॉ. वि. भा. देशपांडे प्रमुख कार्यवाह होते. मात्र, १४ ऑगस्ट २००७ रोजी जोगळेकर यांचे निधन झाल्यामुळे या रिक्त जागी डॉ. देशपांडे यांची कार्याध्यक्षपदी तर, डॉ. माधवी वैद्य यांची प्रमुख कार्यवाहपदी निवड झाली होती. आता प्रा. जोशी यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा प्रमुख कार्यवाह बदलण्याची वेळ आली.
प्रा. मिलिंद जोशी राजीनामा प्रकरणावर पडदा पडला – माधवी वैद्य
म.सा. प.च्या प्रमुख कार्यवाहपदाचा प्रा. मिलिंद जोशी यांनी दिलेला राजीनामा परिषदेच्या कार्यकारिणीने मंजूर केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला असल्याची माहिती परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी रविवारी पत्रकारांना दिली.
आणखी वाचा
First published on: 20-05-2013 at 02:40 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matter of resignation of milind joshi is now over madhavi vaidya