- सासवड नगरीत उत्साहात स्वागत
- पुणेकरांचा पालख्यांना भावपूर्ण निरोप
सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेवर असलेल्या लाखो वैष्णवांच्या संगतीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी दिवे घाटातील अवघड टप्पा लीलया पूर्ण केला. पालखी सासवडला मुक्कामी पोहोचली, त्या वेळी सासवडकरांनी जोरदार स्वागत केले. दरम्यान, माउली व तुकोबांच्या पालख्या शुक्रवारी सकाळी शहरातून मार्गस्थ झाल्या. त्या वेळी पुणेकरांनी दोन्ही पालख्यांना भावपूर्ण निरोप दिला.
माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी दोन वाजता वडकी नाला येथे विसाव्यासाठी थांबला. या वेळी अनेक सार्वजनिक मंडळांनी अन्नदान केले. त्यानंतर दुपारी तीन वाजता सर्वात अवघड टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवेघाटातील वाट सुरू झाली. वातावरणात काहीसा गारवा असल्याने उन्हाचा त्रास झाला नाही. मोठय़ा अंतराचा हा टप्पा चढताना न थकता िदडीतील वारकरी निरनिराळी पदे, अभंग, भारुडे म्हणताना दिसत होते. वारकऱ्यांमध्ये एक वेगळेच चतन्य संचारले होते.
वैष्णवांसंगती सुख वाटे जीवा
आणिक मी देवा काही नेणे
गाये नाचे उडे आपुलीया छंदे
मनाच्या आनंदे आवडीने
असे अभंग म्हणत टाळ मृदंगाच्या तालावर माउली.. माउली.. हा जयघोष करत पालखी सोहळा पुढे सरकत होता. सारे जण विठू नामाच्या भक्तिरसात चिंब होऊन नाचत होते. दिवे घाट चढून पालखीने सायंकाळी पाच वाजता पुरंदर तालुक्यात प्रवेश केला.या वेळी पावसाच्या हलक्या सरी सुरू झाल्या होत्या. स्वागतासाठी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी मंत्री दादा जाधवराव, प्रांत समीर िशगटे, तहसीलदार संजय पाटील, पंचायत समितीच्या सभापती अंजना भोर, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव, विजय कोलते आदी उपस्थित होते. त्यानंतर सोहळा दोन दिवसांच्या मुक्कामासाठी संत सोपानदेवांच्या सासवडनगरीत रात्री आठ वाजता आला.
सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, संत सोपानकाका सहकारी बॅंकेचे संजय जगताप, मुख्याधिकारी विनोद जळक यांनी िदडी प्रमुखांस श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यानंतर पालखी तळावर साडेआठ वाजता समाज आरती झाल्यानंतर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.आज भागवत एकादशी असल्याने सासवडमध्ये वारकऱ्यांसाठी ठिकठिकाणी फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. रा.स्व.संघातर्फे दहा हजार भाविकांना चहाचे वाटप करण्यात आले. मराठवाडा व विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये पेरण्यांची कामे उरकली असल्याने वारीमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
पंढरीच्या वारीला जाताना संत सोपानकाकाही भेटणार याचा आनंद वारकऱ्यांनी व्यक्त केला. शनिवारी(२ जून)सकाळी दहा वाजता सासवडहून संत सोपानकाकांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे, तर रविवारी(३ जून)सकाळी माउलींचा पालखी सोहळा खंडेरायाच्या जेजुरीनगरीत मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे.