मराठी साहित्य-नाटय़ विश्वातील एक महत्त्वाचे लेखक महेश एलकुंचवार यांच्या साहित्यिक कार्यावर बेतलेल्या ‘मौनराग’ या चित्रपटातून त्यांच्या समग्र कलाकृतींचे आकलन उलगडण्याचे शिवधनुष्य पुण्यातील कलाकारांनी पेलले आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (मामी) या चित्रपटाची निवड झाली असून १७ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या महोत्सवात त्याचे प्रदर्शन होणार आहे.
फॅक्ट अँड फिक्शन फिल्म्स आणि अश्विनी परांजपे पॅ्राडक्शन्स यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी इंडिया फाउंडेशन फॉर आर्ट्स, फ्लेम स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्ट्स आणि कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे. महेश एलकुंचवार हे बुधवारी (९ ऑक्टोबर) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. हे औचित्य साधून पुण्यातील रंगकर्मीनी या चित्रपटाची घोषणा करून एलकुंचवार यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली असल्याची माहिती दिग्दर्शक वैभव आबनावे यांनी दिली. त्यांच्यासह धर्मकीर्ती सुमंत आणि आनंद चाबुकस्वार यांनी संहितालेखन केले असून ९४ मिनिटांच्या या चित्रपटामध्ये माधुरी पुरंदरे, अश्विनी गिरी, गजानन परांजपे आणि शशांक शेंडे यांच्या भूमिका आहेत.
आबनावे म्हणाले, आपण कलानिर्मिती का करतो हा प्रश्न एलकुंचवार यांना सतत पडतो. कलेतून स्वत:चा शोध घ्यायचा, पण, हा शोध आत्मपर न राहता त्यांच्या ‘स्व’चा विस्तार होतो. एकूणच त्यांच्या नाटय़ आणि ललित लेखनाचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. तालीम करताना नट दुसऱ्या आवाजाची वाट पाहतो. हा दुसरा आवाज बाहेरून येणार की आतून हा प्रश्न आहे. बाहेर काही नसेल, तर मग बाहेरून येणार काय. मग हा नट वाट कुणाची पाहतो. आपल्या मुखवटय़ावरील एक-एक पापुद्रा काढावा तसा हा नट सगळे मुखवटे उतरवून संवाद साधतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे. मौनराग असे म्हणताना त्याचा स्वत:शी संवाद सुरू आहे.
एलकुंचवार यांचे लेखनच संहितेमध्ये मांडले आहे. यामध्ये उसनवारी काही नाही. चार व्यक्तींच्या आत्मसंवादातून हे लेखन उलगडत जाते, असे आनंद चाबुकस्वार यांनी सांगितले. तर, या चित्रपटामध्ये भूमिका करताना अभिनेत्री आणि माणूस म्हणूनही स्वत:चा शोध घेता आला, असे अश्विनी गिरी यांनी सांगितले.
‘मौनराग’ या कलात्मक चित्रपटातून होणार एलकुंचवारांच्या कलाकृतींचे आकलन
महेश एलकुंचवार हे बुधवारी (९ ऑक्टोबर) अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहेत. हे औचित्य साधून पुण्यातील रंगकर्मीनी एलकुंचवार यांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली असल्याची माहिती दिग्दर्शक वैभव आबनावे यांनी दिली.

First published on: 09-10-2013 at 04:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maunrag art film on artistry of mahesh elkunchwar