पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांचा गाठीभेटींवर भर आहे. बारणे यांनी घाटाखालील रायगड जिल्ह्यातील खोपोलीत, तर वाघेरे यांनी घाटावरील देहूरोड, तळेगाव दाभाडे शहरात पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दोघांनीही गाठीभेटींवर भर दिला आहे. मावळ मतदारसंघ पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागला आहे. त्यामुळे उमेदवारांची प्रचार करताना दमछाक होताना दिसते.

महायुतीकडून लढत असलेले शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी खोपोली शहरातील शिवसेना व भाजप कार्यालयांसह शहरातील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह खोपोलीत मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. शहरप्रमुख संदीप पाटील, समन्वयक राजू गायकवाड, संघटक तात्या रिठे, भाजप कार्यालयात शहराध्यक्ष रमेश रेटरेकर, इंदरशेठ खंडेलवाल, विजय तेंडुलकर, हेमंत नांदे यांची भेट घेतली. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचा निर्धार या वेळी कार्यकर्त्यांनी केला.

हेही वाचा : तंत्रशिक्षण संस्थांतील अध्यापनात आता स्थानिक भाषेचा अधिकाधिक वापर… काय आहे महत्त्वाचा निर्णय?

महाविकास आघाडीकडून लढत असलेले ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांनी देहूरोड येथील पदाधिकारी, नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष आशिष खांडगे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांनी चौराई देवी महोत्सवालाही भेट दिली. मावळमध्ये बदल घडणार असा विश्वास कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला.

Story img Loader