पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह यावेळी महायुतीमुळे मतदान यंत्रावर राहणार नाही. ताकद असतानाही महायुतीत शिवसेनेला जागा सुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला माघार घ्यावी लागली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनी निवडणूक लढविलेल्या मावळातून घड्याळ हद्दपार झाले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मतदान करावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानला जात असलेल्या पिंपरी-चिंचवडचा समावेश मावळमध्ये आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत मावळ मतदारसंघ कायम राष्ट्रवादीकडे राहिला. मतदारसंघाच्या निर्मितीपासून राष्ट्रवादी काँग्रेस येथे निवडणूक लढवत आली आहे. पहिल्यांदा पिंपरीचे माजी महापौर आझम पानसरे, दुसऱ्यावेळी विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर तर गेल्या वेळी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी हट्टाने निवडणूक लढविली. त्यांना दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव चाखावा लागला. पराभव झाल्यानंतर पार्थ यांनी मावळकडे फिरकणे टाळले. तिन्हीवेळेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अपयशला सामोरे जावे लागले आहे.

हेही वाचा – केजरीवालांच्या अटकेचा धक्का कोणाला आणि का?

पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीची ताकद २०१४ मध्ये कमी झाली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, आझम पानसरे यांनी भाजपची वाट धरली. २०१७ मध्ये पालिकेतील राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून घेत कमळ फुलविले. २०१९ मध्ये राष्ट्रवादीने पुन्हा उभारी घेतली. पिंपरीतून अण्णा बनसोडे तर मावळमधून सुनील शेळके राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. तर, मागीलवर्षी चिंचवडमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांना घड्याळावर लाखभर मते मिळाली. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर शहरातील आमदारांसह पक्ष संघटना, माजी नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत राहिले. राष्ट्रवादीने या ताकदीच्या जोरावर महायुतीत मावळ मतदारसंघावर दावा केला. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी प्रबळपणे दावेदारी सांगितली.

हेही वाचा – दहावीत नापास झालात? काळजी नसावी कारण येत आहे नवे धोरण…

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मावळमध्ये पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. रायगड जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघ राष्ट्रवादीलाच मिळाला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली. परंतु, महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जागा कायम राहिली. त्यामुळे मतदारसंघात ताकद असतानाही राष्ट्रवादीला महायुतीमुळे माघार घ्यावी लागली. मतदारसंघाच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा मावळात उमेदवार राहणार नाही. मतदान यंत्रावर घड्याळ चिन्ह दिसणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धनुष्यबाणाला मतदान करावे लागणार आहे.

हेही वाचा – भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात वाढ

महायुतीमुळे मावळमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार समजून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचे पूर्ण ताकदीने आम्ही काम करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval lok sabha constituency no watch sign in maval where ajit pawar son partha pawar contested ggy 03 ssb