पिंपरी : लोकसभा निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया सुरू झाली, तरी मावळमधील महायुतीच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळवर मित्रपक्ष भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अद्यापही कायम आहे. त्यातच खासदार श्रीरंग बारणे यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे महायुतीमधील उमेदवारीचा तिढा वाढतच असल्याचे चित्र आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात या वेळी सुरुवातीपासून महायुतीमधील मित्रपक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध आहे. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी उघडपणे बारणे यांना विरोध केला. त्यांच्यानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीनेही मावळवर दावा करत माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली, तर मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. त्यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार बारणे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना कधीही विश्वासात घेतले नाही. मतदारसंघात भाजपची ताकत आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला मिळावा, खासदार बारणे यांना उमेदवारी दिली तर आम्ही प्रचार करणार नाही, कार्यकर्ते विक्रमी संख्येने नोटाला मतदान करतील, असा इशारा मावळच्या भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
हेही वाचा – पुण्यात काँग्रेसमधील वाद मिटेना
दुसरीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात विजय शिवतारे हे महायुतीचा धर्म पाळत नाहीत. त्यामुळे आम्ही मावळमध्ये शिवसेना उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. त्यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद वाढल्याचे दिसून येत आहे. या वादातूनच मावळ मतदारसंघ महायुतीत कोणाला सुटणार, उमेदवार कोण असणार हे जाहीर होण्यास विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. महायुतीकडून आपली उमेदवारी निश्चित असल्याचे सांगणारे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे देखील उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने अस्वस्थ दिसत आहेत. त्यातूनच खासदार बारणे यांनी मंगळवारी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चा केली. बारणे यांची उमेदवारी निश्चित असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. परंतु, उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने शिवसैनिकांमध्ये धाकधूक दिसून येत आहे.
हेही वाचा – मनसेचे परप्रांतीयांविरोधातील ‘खळ्ळ्य खट्ट्याक’ बंद ? महायुतीसाठी भाजपची अट
ठाकरे गटाची आघाडी
महाविकास आघाडीत मावळ लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाला सुटणार असल्याचे निश्चित आहे. उद्धव ठाकरे यांनी संजोग वाघेरे यांची उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यानुसार वाघेरे यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसते.