पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान (ईव्हीएम) यंत्रे तसेच टपाली मतपेट्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या सुरक्षा कक्षात (स्ट्राँगरूम) सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. कडेकोट बंदोबस्त असणारी सुरक्षा कक्ष मंगळवारी (१४ मे) लाखबंद (सील) करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर, निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सीआरपीएफचे सुभेदार दुर्गेश कुमार मीना तसेच मावळ लोकसभा निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून ४ जून २०२४ रोजी बालेवाडीत मतमोजणी पार पडणार आहे. मतदानासाठी वापरलेली मतदान यंत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील वेटलिफ्टिंग हॉलच्या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या सूचनांची अंमलबजावणी करून सुरक्षा कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या कक्षाला केंद्रीय सुरक्षा दलासह महाराष्ट्र पोलीस दलाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ‘सीसीटीव्ही’ यंत्रणेसह आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: पत्नीला शिवीगाळ केल्याने मित्राची हत्या; गुंडा विरोधी पथकाने आरोपीला ठोकल्या बेड्या

मतदान प्रक्रिया पार पाडल्यानंतर पनवेल, मावळ, उरण, कर्जत, पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ निहाय निश्चित केलेल्या ठिकाणी मतदान साहित्य जमा करण्यात आले. त्या ठिकाणाहून कंटेनरमध्ये मतदानासाठी वापरलेली मतदान यंत्रे आणि मतमोजणीसाठी आवश्यक इतर मतदान साहित्य कडेकोट पोलीस बंदोबस्तात रात्री उशिरापर्यंत बालेवाडी येथे आणण्यात आले. त्यानंतर मतदान यंत्रांसह सर्व साहित्य सुरक्षारूममध्ये ठेऊन ही रूम लाखबंद करण्यात आली.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: लंडनवरून येऊन तरुण मतदाराने बजावला मतदानाचा हक्क

पनवेल विधानसभा मतदारसंघाकरीता १६३२ बॅलेट युनिट, ५४४ कंट्रोल युनिट आणि ५४८ व्हीव्हीपॅट यंत्रे, कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी १०१७ बॅलेट युनिट, ३३९ कंट्रोल युनिट आणि ३४५ व्हीव्हीपॅट यंत्रे, उरण विधानसभा मतदारसंघासाठी १०३२ बॅलेट युनिट, ३४४ कंट्रोल युनिट आणि ३४६ व्हीव्हीपॅट यंत्रे, मावळ विधानसभा मतदारसंघासाठी ११७० बॅलेट युनिट, ३९० कंट्रोल युनिट आणि ३९६ व्हीव्हीपॅट यंत्रे, चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी १६४७ बॅलेट युनिट, ५४९ कंट्रोल युनिट आणि ५५६ व्हीव्हीपॅट यंत्रे, पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी १२०० बॅलेट युनिट, ४०० कंट्रोल युनिट आणि ४०२ व्हीव्हीपॅट यंत्रे असे एकूण ७६९८ बॅलेट युनिट, २५६६ कंट्रोल युनिट आणि २५९३ व्हीव्हीपॅट यंत्रे वापरण्यात आली आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval lok sabha election 2024 place where evm machines are kept and security at strong room pune print news ggy 03 css