2024 maval Lok Sabha Election 2024 updates पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस दिसून येत आहे. भाजपचे बालेकिल्ला असलेल्या पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंग बारणे यांना सुरुवातीपासून आघाडी आहे. बालेकिल्ला असलेल्या पिंपरीतून वाघेरे पिछाडीवर आहेत. त्यांना केवळ मावळ विधानसभा मतदारसंघातून आघाडी आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, उरण, कर्जत, पिंपरी, चिंचवड आणि मावळ हे विधानसभा मतदारसंघ येत आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून महायुतीचे पारडे जड दिसत होते. परंतु, अटीतटीची लढत होत असल्याचे पहिल्या कलातून दिसत आहे. भाजपचे बालेकिल्ला असलेल्या पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघावर महायुतीची मदार होती. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघातून बारणे यांना सुरुवातीपासून आघाडी मिळत आहे.
पहिल्या फेरीपासून बारणे आघाडीवर आहेत. तर, वाघेरे यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघातही बारणे यांना आघाडी मिळत आहे. कर्जत, उरण या दोन्ही विधानसभा मतदारसंघात बारणे आणि वाघेरे यांना बरोबरीत मते मिळताना दिसत आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या मावळ विधानसभा मतदारसंघातून वाघेरे यांना आघाडी मिळताना दिसत आहे.