पुणे : शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी थेट लढत असलेल्या मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे. श्रीरंग बारणे हे ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले आहेत. बारणे यांना ६ लाख ९२ हजार ८३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली आहेत.
मावळ लोकसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली. महाराष्ट्रातील प्रमुख लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जात होतं. शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी निवडणूक असल्याने शिवसैनिकांचं या ठिकाणी विशेष लक्ष होतं. २००९ पासून आजतागायत मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा पगडा राहिलेला आहे. आज देखील हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
हेही वाचा…३५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा होती, मात्र पैशांची…; रोहित पवारांनी व्यक्त केली नाराजी
बारणे यांनी सलग तिसरा विजय मिळवत हॅट्रिक केली आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा बारणे यांनी दोन लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. हे २०१४ मध्ये चित्र बदलेल असं वाटत असतानाच बारणे यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणलेला आहे. अगोदर पासून ही निवडणूक नात्या-गोत्या भोवती फिरल्याच पाहायला मिळालं, मात्र बारणे यांनी नेहमीच हे नाकारलं. देशात पंतप्रधान कोण हे ठरवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं वारंवार बारणे यांनी म्हटलं. यामुळे बारणे यांचा विजय सुकर झाल्याचं बोललं जात आहे.