पिंपरी-चिंचवड: शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेतून उमेदवारी अर्ज भरला आहे. तर संजय वाघेरे नामक व्यक्तीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याची चर्चा पिंपरी- चिंचवडसह मावळ लोकसभा मतदारसंघात रंगली आहे. दोघांच्या नावांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य असल्याने मतांची विभागणी होऊ शकते यात तीळ मात्र शंका नाही.
निवडणुका म्हटलं की डावपेच आलेच. मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अस असलं तरी आता संजय वाघेरे नावाच्या व्यक्तीने अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने एकच चर्चा रंगली आहे. दोघांची नावं संजय आणि संजोग अशी असून आडनाव वाघेरे असल्याने दोघांच्या नावांमध्ये काही प्रमाणात साधर्म्य आढळत आहे. त्यामुळे संजय वाघेरे यांचा अर्ज बाद न झाल्यास आणि उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांची मत विभागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा : अमोल कोल्हेंचे ‘ते’ विधान बालिशपणा अन् अज्ञानातून; शिवाजी आढळरावांचा टोला
संजय वाघेरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभा करण्याकरिता नेमकी कोणाची खेळी आहे?, त्यांच्या मागे कोणाचा हात आहे?, नेमका त्यांचा उद्देश काय आहे?, अशी अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. परंतु, महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या संजय वाघेरे यांचा काहीसा अडसर होऊ शकतो.