पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा खासदार असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजपने प्रबळ दावा केला आहे. भाजपचे मावळचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यानंतर आता पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत मावळच्या उमेदवारीचा तिढा वाढतच असल्याचे दिसते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मावळ लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणत्या पक्षाकडे राहणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांत विभागलेल्या मावळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सलग दुसऱ्या वेळी शिवसेनेचे श्रीरंग बारणे करत आहेत. राजकीय समीकरणे बदलल्याने महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने मावळवर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. शेळके यांचा खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे. भाजपनेही मावळवर दावा केला. तिन्ही वेळेस युतीमध्ये भाजपला निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही. या वेळी भाजपला संधी मिळावी. उमेदवार कमळाच्या चिन्हावर असावा, अशी भाजपची मागणी आहे. मावळचे माजी आमदार, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दंड थोपटले असून, त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

भेगडे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत खासदार बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला असतानाच आता पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचेही नाव पुढे आले आहे. महायुतीत मावळची जागा भाजपलाच मिळावी. शहराध्यक्ष जगताप यांना उमेदवारी द्यावी. शहराध्यक्ष म्हणून जगताप करत असलेले कार्य याचा विचार करून त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित होईल. शिवाय महायुती तसेच भाजपला विशेष फायदा होईल, अशा मागणीचे निवेदन भाजप शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

हेही वाचा – ओला, उबरवरील कारवाईला ‘ब्रेक’! आरटीओचे एक पाऊल मागे; कारण काय…

सन २०१४ च्या निवडणुकीत शंकर यांचे बंधू दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून निवडणूक लढविली होती. याचाही फायदा पक्षाला तसेच महायुतीला होऊ शकतो. त्यामुळे शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याची मागणी काळभोर यांनी केली आहे. त्यामुळे आता उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये भाजपच्या आणखी एका नेत्याचे नाव पुढे आले आहे. महायुतीमधील तिढा वाढतच चालला असल्याचे दिसते. यातून नेमका कसा मार्ग काढला जातो, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्यास राष्ट्रवादीचा नकार

बारामतीमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे हे महायुतीचा धर्म पाळत नसल्याने शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मावळमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार दिला आहे. शिवतारे यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही, तर आम्हीही पाळणार नाही. पार्थ पवार यांचा मागील वेळी झालेल्या पराभवाचा या घडामोडीशी काहीही संबंध नाही. आता तिन्ही पक्षांची महायुती आहे. तिन्ही पक्षांनी महायुतीचा धर्म पाळावा. शिवतारे हे मुख्यमंत्र्यांचा शब्द पाळतील असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval lok sabha shankar jagtap in maval rift has increased in grand alliance after bjp bala bhegde there is demand to nominate this leader pune print news ggy 03 ssb