पुण्याच्या मावळमधील तळेगाव एमआयडीसी येथील जनरल मोटर ही कंपनी बंद पडली असून यामुळे हजारो कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या कंपनीच्या जागी ह्युंदाई कंपनी सुरू झाली आहे. परंतु, संबंधित कामगारांना कामावर घेण्याबाबत संभ्रम आहे. यामुळेच हजारो कामगार रस्त्यावर उतरले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी ह्युंदाई कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना इशारा देत दहा तारखेच्या आत कामगारांना कामावर न घेतल्यास तळेगाव एमआयडीसी ठप्प करण्याचा इशारा दिला आहे. कंपनी बंद पडली तरी चालेल भूमिपुत्रांच्या नोकरीचा प्रश्न मिटला पाहिजे, अशी भूमिका शेळके यांनी घेतली आहे.

हेही वाचा – पुण्यातील धरणांमध्ये ९७.४१ टक्के पाणीसाठा; खडकवासला धरणातील विसर्ग कायम

हेही वाचा – पिंपरी : महापालिकेच्या ४१ हजार मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटिसा, होणार ‘ही’ कारवाई

सुनील शेळके म्हणाले, सरकार तुमच्याकडे गांभीर्याने बघत नाही. अनेक मंत्र्यांसोबत बैठका झाल्या. आता बैठका किती आणि कोणाकडे लावायच्या? हादेखील प्रश्न पडलेला आहे. काहीतरी निर्णय येईल म्हणून तुम्ही कामगार आमच्याकडे अपेक्षेने पाहत असता. आज तुमचा संयम सुटल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंती दिवशी रस्त्यावर उतरलात. मी सत्तेत आहे, म्हणून सत्तेची बाजू घेत नाही. वस्तुस्थिती सरकारने स्वीकारली पाहिजे. कामगारांचे म्हणणं सरकारने ऐकलं पाहिजे. जनरल मोटर कंपनी बंद झाल्यानंतर ह्युंदाई कंपनीने काम सुरू केलं. जनरल मोटार आणि ह्युंदाईच्या एमडीला मी सांगतो. आमचा कंपनीला विरोध नाही. त्यांचं स्वागतच आहे. जोपर्यंत भूमिपुत्रांच्या कामांचा प्रश्न मिटत नाही. तोपर्यंत कुठलंही काम कंपनीत करता येणार नाही. तुम्ही आज सर्व रस्त्यावर उतरला आहात. ही परिस्थिती बघून राज्यकर्त्यांना घाम फुटक्याशिवाय राहणार नाही. आज २ तारीख आहे, राज्यसरकारने १० तारखेच्या आत जर निर्णय घेतला नाही. यानंतर सर्व गाड्या-घोड्या बंद करणार. एक नाही चार कंपन्या गेल्या तरी चालतील काही फरक पडत नाही. कामगारांना देशोधडीला लावण्याचे काम ही कंपनी करत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maval mla sunil shelke has warned the officials of hyundai company kjp 91 ssb