मावळ: भाजपमधील नेत्यांनी पक्ष एकसंघ कसा ठेवता येईल हे पहावं. आमच्यात येऊन लुडबुड करून भांडण लावायचे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. सुनील शेळके हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मावळ विधानसभा मतदारसंघात शरद पवारांचा छुपा पाठिंबा घेऊन पुरस्कृत उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे देखील शेळके यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील बापू भेगडे हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो आहे. अजित पवारांना समक्ष भेटलो आहे.

सुनील शेळके म्हणाले, भाजप मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे पाहावं. आमच्याकडे येऊन लुडबुड करायची आणि भांडण लावायचे हे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा शेळके यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचं आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. तालुका आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका असंही त्यांना म्हटलं आहे.

हेही वाचा : ‘चिंचवड’ची जागा शिवसेना ठाकरे पक्षाला? तर, पिंपरी आणि भोसरी….

पुढे ते म्हणाले, मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाही. यामुळे राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेते किंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत. वेगळी रणनीती आखत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत. तरीही महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला आहे.