निवडणुकीला उभारलेल्या कोणत्याही उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास नकाराधिकाराचे ‘नोटा’ (नन ऑफ दी अबोव्ह) हे बटन यंदा प्रथमच मतदान यंत्रात देण्यात आले होते. त्याचा वापर अनेक मतदारांनी केला असल्याचे मतमोजणीत स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्य़ातील मतदार संघामध्ये बारामती त्यात आघाडीवर असून, या मतदार संघात तब्बल १४ हजार २१६ मतदारांनी नोटा बटनाचा वापर केला. त्यामुळे ‘नोटा’मध्ये बारामतीचा जिल्ह्य़ात पहिला क्रमांक, तर राज्यात तिसरा क्रमांक लागला आहे. जिल्ह्य़ातील चार मतदार संघात ३८ हजारांहून अधिक मतदारांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे.
जिल्हातील पुणे, बारामती, मावळ व शिरूर या चारही मतदार संघाच्या प्रत्येक मतदान केंद्रावर एक का होईना, पण नोटा बटनाचा वापर झाल्याचे मतमोजणीतून स्पष्ट झाले आहे. बारामती मतदार संघाच्या खालोखाल शिरूर मतदार संघामध्ये ११ हजार ९८५ मतदारांनी नोटा बटनाचा वापर करून मत नोंदविले. मावळ मतदार संघामध्येही ११ हजार १८६ लोकांनी ‘नोटा’ ला पसंती दिली. जिल्ह्य़ातील या तीन मतदार संघाच्या तुलनेत पुणे मतदार संघामध्ये नोटा बटनाचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी असली, तरी याही मतदार संघात ६ हजार ४३८ मतदारांनी नोटा बटनाचा वापर केला आहे.
‘नोटा’ या बटनावर मतदान केल्यास त्याचा उमेदवारांच्या मतावर परिणाम होत नसला तरी केवळ ‘नोटा’च्या मताची नोंद करण्यासाठी व आपल्याला एकही उमेदवार मान्य नसल्याचे सांगण्यासाठी शेकडो लोक मतदान केंद्रांपर्यंत गेल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
मतदारसंघ एकूण मतदार झालेले मतदान नोटा
पुणे : १८,३३,७९४ ९,९४,६२४ ०६,४३८
मावळ : १९,५२,२०८ ११,७४,४६४ ११,१८६
बारामती : १८,१०,००६ १०,६५,५८० १४,२१६
शिरूर : १८,२०,४१० १०,८८,०७२ ११,९७१
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा