वीजग्राहकांशी अत्याधुनिक माध्यमातून संपर्कात राहून त्यांच्याशी संवाद साधण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’ने सुरू केलेल्या फेसबुकवर सर्वाधिक पुणेकर फ्रेण्ड्स कनेक्टेड झाले आहेत. राज्यभरात दहा हजारांहून अधिक वीजग्राहक फेसबुकच्या माध्यमातून ‘महावितरण’शी संवाद साधत आहेत.
‘महावितरण’कडून गेल्या काही दिवसांमध्ये ग्राहकांच्या सुविधांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास सुरुवात केली आहे. इंटरनेटच्या वापरातून ई-पेमेंटची सुविधाही देण्यात आली. त्या माध्यमातून जगभरात कुठूनही वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. सध्याच्या युगामध्ये सोशल नेटवर्किंगमधील संवादाचे माध्यम म्हणून फेसबुकचे महत्त्व लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी ‘महावितरण’ने फेसबुक सुरू केले. ‘महावितरण’च्या पुणे, नागपूर, भांडूप, रत्नागिरी, कल्याण, कोल्हापूर आदी परिमंडलामध्ये फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधला जात आहे. राज्यातील दहा हजारांहून अधिक ग्राहक या फेसबुकला कनेक्टेड आहेत. त्यात पहिला क्रमांक पुणेकरांचा आहे. पुणे परिमंडलातून २१९३ ग्राहक महावितरणच्या फेसबुकवर आहेत. त्या पाठोपाठ नागपूर शहर परिमंडलाचा (२१६५) क्रमांक लागतो. इतर विभागांमध्येही हळूहळू ‘महावितरण’च्या फेसबुकला कनेक्टेड होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
परिमंडलनिहाय असलेल्या या फेसबुकवर ‘महावितरण’विषयक घडामोडींच्या माहितीपर व विकासात्मक बातम्या दिल्या जातात. इंटरनेट व मोबाइलद्वारे वीजबिलांचा भरणा, ई-बिल सेवा, प्रीपेड मीटर आदी सेवांची माहिती व सादरीकरणही फेसबुकच्या माध्यमातून प्रसारित केली जाते. विजेची निर्मिती ते वितरण त्याचप्रमाणे वीजसुरक्षेविषयीच्या उपाययोजनांच्या माहितीचाही त्यात समावेश केला जातो. ‘महावितरण’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी ‘विद्युत वार्ता’ च्या माध्यमातून केलेले हितगुजही फेसबुकवर पाहावयास मिळते. फेसबुक अकाऊंटवर Mahavitaran Pune या पत्यावर पुणे परिमंडलासाठी फेसबुक उपलब्ध आहे.
फेसबुकवरून दिल्या जाणाऱ्या माहितीबाबत फ्रेण्ड्स असलेल्या ग्राहकांना प्रतिक्रियांसह तत्काळ प्रतिसाद देण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. फेसब्कवरील ही माहिती लाइक किंवा शेअर होत असल्याने ‘महावितरण’च्या फेसबुकवरील फ्रेण्ड्स ऑफ फ्रेण्ड्सच्या अकाउंटवरही ही माहिती प्रसारित होत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा