मे महिन्याचा पूर्वार्ध म्हणजे टळटळीत ऊन, हवेतील उष्मा आणि घामाच्या धारा! सध्या मात्र हेच दिवस असूनही यापैकी काहीही अनुभवायला मिळत नाही. तापमान सरासरीइतकेही वाढत नाही. ऊन आहे, पण चटका नाही. वातावरण म्हणाल तर- ठंडा ठंडा, कूल कूल! विशेष म्हणजे आणखी काही दिवस म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत तरी पुण्यात अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. पुण्याबरोबरच राज्याच्या इतर भागातही तापमान सरासरीच्या तुलनेत कमीच नोंदवले जाईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे.
पुण्याच्या हवामानाची वैशिष्टय़े म्हणजे- दरवर्षी उन्हाळ्यात सामान्यत: चाळीस अंशांचा टप्पा ओलांडला जातोच. काही दिवस तरी तापमान ४० अंशांच्या वर कायम राहते. विशेषत: एप्रिलची अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीला सर्वाधिक तापमानाची नोंद होते. या वर्षी उन्हाळ्यात तापमानाने पुण्यात ४० अंशांचा टप्पा ओलांडला. ३० एप्रिल रोजी हंगामातील उच्चांकी ४०.७ अंश तापमानाची नोंद झाली. त्यानंतर १ मे रोजीसुद्धा तापमान ४० अंशांच्या वर होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात असाच घाम काढणारा उकाडा अनुभवायला मिळाला.
त्यानंतर म्हणजे ७ मेपासून मात्र स्थिती पूर्णपणे बदलली. तापमानात अचानक घट झाली. कमाल तापमानात तर लक्षणीय बदल झाल्याचे पाहायला मिळाले. ४० अंशांच्या आसपास असणारे कमाल तापमान एकदम ३७ अंशांच्या खाली आले. त्यानंतर ते गेले आठवडाभर ३५ आणि ३६ अंशांच्या आसपास कायम राहिले. या स्थितीमुळे पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात दिलासा मिळाला आहे. दुपारी बाहेर फिरले तरी विशेष क डाका जाणवत नाही. रात्रीसुद्धा हवेत गारवा जाणवू लागला आहे. त्यात भर म्हणजे रात्रीच्या वेळी वारे वाहत आहेत. त्यामुळे वातावरणातील गारव्यात वाढ होत आहे.
पुण्यापेक्षा एरवी तुलनेने उष्ण असलेल्या लोहगाव परिसरातील वेधशाळेतही तापमान उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. तिथे या दिवसांत सरासरी कमाल तापमान ३९ अंशांच्या आसपास असते. ते गेले आठवडाभर ३८ अंशांपर्यंतही गेलेले नाही. मे महिन्याच्या अखेरच्या आठवडय़ात पुण्याला पावसाचे वेध लागतात. या काळात एक-दोन मोठे उन्हाळी पाऊस होतात. त्यानंतर पावसाळ्याला सुरुवात. त्यामुळे पुढच्या काळात उष्णतेची लाट येण्याची किंवा तापमानात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे नाहीत, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
का आणि कशामुळे?
‘‘देशाच्या बऱ्याचशा प्रदेशावर सध्या ढगाळ वातावरण आहे. विशेषत: ज्या भागातून महाराष्ट्रात उष्ण वारे येतात, त्या राजस्थानात अशी स्थिती आहे. राजस्थानप्रमाणेच दिल्ली, उत्तर भारताच्या पट्टय़ात सध्या ढगाळ आणि पावसाळी वातावरण कायम आहे. त्याच भागातून महाराष्ट्रात वारे येत आहेत. एरवी ते उष्ण व कोरडे असतात. पण सध्या ते आर्द्र आहेत. त्यांचा वेगही जास्त असल्याने तापमानात घट होण्यास अनुकूल स्थिती आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात गेले पाच-सहा दिवस बंगालच्या उपसागरावरूनही मोठय़ा प्रमाणात बाष्प येत होते. याचीही त्यात भर पडली. या कारणांमुळे कमाल तापमान कमी राहत आहे. वाऱ्यांमुळे वातावरणात गारवासुद्धा अनुभवायला मिळत आहे. पुढील तीन-चार दिवसांत वातावरण असेच राहील. पुणे शहरातील कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यानंतर तापमानात फार मोठी वाढ होण्याचीही चिन्हे नाहीत.’’
– डॉ. मेधा खोले, उपमहासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग
गेल्या आठवडाभरातील कमाल तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये)
दिनांक        पुणे            लोहगाव
१३ मे        ३६.१        ३७.८
१२ मे        ३५.९        ३७.३
११ मे        ३५.९        ३७.३
१० मे        ३५.१        ३६.७
०९ मे        ३६.१        ३६.८
०८ मे        ३६.५        ३७.१
०७ मे        ३७.०        ३७.४

Story img Loader