पिंपरी महापालिकेच्या वतीने वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध महापौर चषक स्पर्धाना माजी महापौरांचे नाव देण्याच्या प्रस्तावास क्रीडा समितीच्या बैठकीत तीव्र विरोध करण्यात आला. जिवंत असलेल्या व्यक्तींच्या नावाने स्पर्धा कशासाठी, असा मुद्दा उपस्थित करतानाच भविष्यात माजी महापौर वाढतील आणि स्पर्धा कमी पडतील, तेव्हा काय करणार, अशी शंका व्यक्त करण्यात आली. अखेर, सर्व बाजूने विचार करण्यासाठी महिनाभरासाठी हा प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.
क्रीडा समितीचे सभापती समीर मासूळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आतापर्यंत महापौरपदाची धुरा सांभाळणाऱ्या २३ जणांचा गौरव करण्याच्या हेतूने एकेका खेळाच्या स्पर्धेला अनुक्रमानुसार सर्व माजी महापौरांची नावे देण्यात यावीत, असा प्रस्ताव बैठकीत होता. सर्व माजी महापौरांचे शहरासाठी असलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा मानस असल्याचा युक्तिवाद करण्यात आला, त्यावर सविस्तर चर्चा झाली. माजी महापौरांच्या बैठकीत ठरलेल्या निर्णयानुसार प्रस्ताव मांडण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. एकूणापैकी पाच माजी महापौरांचे निधन झाले आहे. उर्वरित व्यक्ती जिवंत असताना त्यांची नावे देणे योग्य आहे का, असा मुद्दा काही सदस्यांनी उपस्थित केला. सव्वा वर्षांला एक याप्रमाणे महापौर बदलत जाणार, त्यानुसार आगामी काळात माजी महापौरांची संख्या वाढेल, तेव्हा स्पर्धा कमी व नावे जास्त होतील. तेव्हा काय करणार, अशी विचारणा सदस्यांनी केली. प्रशासनाकडून कोणताही खुलासा झाला नाही. अखेर, एक महिन्यांसाठी प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा