पुणे महापालिकेतर्फे यंदाही अखिल भारतीय स्तरावरील महापौर चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून २६ डिसेंबर रोजी या स्पर्धाचे उदघाटन होईल. कुस्तीची मोठी परंपरा असलेल्या श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना तीस लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
महापौर चंचला कोद्रे यांनी शनिवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. सभागृहनेता सुभाष जगताप हेही या वेळी उपस्थित होते. गेल्यावर्षी ही कुस्ती स्पर्धा महापालिका हद्दीबाहेर घेण्यात आली होती. तसेच स्पर्धेच्या खर्चाबाबतही मोठे वाद झाले होते. यंदा मात्र कुस्ती क्षेत्रातील सर्वाच्या मागणीनुसार ही स्पर्धा शिवाजी स्टेडियम येथे होत असून ती तीन दिवस चालेल. स्पर्धेतील अंतिम लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होईल. बक्षीस समारंभही पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
मंगळवार पेठेतील श्री शिवाजी आखाडय़ात अनेक वर्षे कुस्त्यांचे आयोजन केले जात असे. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आणि महाराष्ट्र केसरी समाधान बोडके यांच्यात येथे कुस्ती झाली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत तेथे मोठी स्पर्धा झालेली नाही. वापर नसल्यामुळे या स्टेडियमची मोठय़ा प्रमाणात दुरवस्थाही झाली होती. महापालिकेने महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण दुरुस्ती व अन्य आवश्यक कामे येथे केली आहेत. ही कुस्ती स्पर्धा २६ ते २८ डिसेंबर दरम्यान चालेल. स्पर्धेत विविध वजनगटातील विजेत्यांना तीस लाख १७ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार असून संपूर्ण स्पर्धेसाठी ७० लाख रुपये खर्च येणार आहे.