‘साहेब’ व अजितदादांशी घरोबा, लांडे घराण्याची सून व आमदारपत्नी असल्याचा पुरेपूर फायदा घेत मोहिनी विलास लांडे यांनी सव्वा वर्षांसाठी संधी मिळाली असताना रेटून अडीच वर्षे महापौरपद उपभोगले. पक्षातील गटबाजी, गावकी-भावकी व पै पाहुण्यांचा संघर्ष असतानाही अनुभवी महापौरांनी समतोल साधला. शहराची जबाबदारी असताना ‘मिशन भोसरी’ राबवले. विकासकामांची जंत्री देतानाच सातत्याने पाठपुरावा करूनही अनधिकृत बांधकामे व शास्तीकराचा प्रश्न न सुटल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मावळत्या महापौरांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत महत्त्वाच्या कामांचा आढावा घेतला. शरद पवार व अजितदादांविषयी कृतज्ञता व्यक्त करतानाच सत्तारूढ-विरोधी नेत्यांचे व आयुक्त राजीव जाधव व डॉ. श्रीकर परदेशींचे सहकार्य लाभल्याचे आवर्जून सांगितले. ‘बेस्ट सिटी’कडून ‘स्मार्ट सिटी’ म्हणून शहर विकसित केले. क्रीडा धोरण, नागरिकांची सनद, सारथी, ई व फ क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती, २२६८ घरकुलांचे वाटप, नाशिकफाटय़ाचा दुमजली उड्डाणपूल, भोसरीतील शिवसृष्टी, माउली-संत नामदेवांच्या भेटीचे शिल्प, चापेकर बंधूंचे समूहशिल्प, पीएमपीची अनुकंपा भरती आदी ठळक बाबी कारकीर्दीत झाल्याचे महापौरांनी नमूद केले. २४ तास पाणीपुरवठा तसेच भविष्यात भामा-आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन, ताथवडे विकास आराखडय़ाला मंजुरी, मेट्रो, बीआरटीसाठी पाठपुरावा केला. शहराच्या सर्वागीण विकासात योगदान देण्याची संधी मिळाल्याचे समाधानही व्यक्त केली.
डॉ. श्रीकर परदेशींचे काम चांगले होते. मात्र, ‘पाडापाडी’मुळे त्यांच्याशी संघर्ष झाला. विदेशी दौऱ्यांचा उपयोग शहर हितासाठी झाला. तांत्रिक अडचणींमुळे सभा तहकूब कराव्या लागल्या, पक्षात गटबाजी नाही. आपल्याला कोणीही त्रास दिला नाही, सर्वाचे सहकार्य लाभले. विधानसभा आमदार लांडेच लढवतील, पुढे कधी संधी मिळाल्यास आपणही विचार करू, अशी उत्तरे त्यांनी विविध प्रश्नांवर बोलताना दिली. नगरसेवक अजित गव्हाणे, अरुण बोऱ्हाडे, आशा सुपे, साधना जाधव, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, श्रद्धा लांडगे, शुभांगी बोऱ्हाडे, पौर्णिमा सोनवणे आदी उपस्थित होते.

Story img Loader