पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून मिळत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ८ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या प्रश्नपत्रिका विद्यापीठातील काही वरिष्ठ पदावरील व्यक्तींकडूनच फुटत असल्याची चर्चा विद्यापीठात आहे.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच मिळत होत्या. परीक्षेपूर्वी काही तास विद्यार्थ्यांना व्हॉट्स अॅपवर प्रश्नपत्रिका मिळत होत्या. असे प्रकार विद्यापीठात यापूर्वीच्या परीक्षांमध्येही घडले आहेत. हे प्रकार विद्यापीठातील काही वरिष्ठ पदस्थांकडूनच घडत असल्याची चर्चा विद्यापीठात आहे. त्यामुळे या प्रकारांची चौकशी करून त्यामध्ये प्रामाणिकपणे आणि धैर्याने पुढे येऊन तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच खोटे पाडण्याचा प्रकार विद्यापीठात यापूर्वीही घडला आहे. या वेळीही विद्यापीठामध्ये इतिहासाची पुनारावृत्ती होताना दिसत आहे.
विद्यापीठाच्या परीक्षांसाठी संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्यांनी आणि अभ्यास मंडळानी नियुक्त केलेले पॅनेल काम करत असते. या पॅनेलमधील सदस्यांकडे विविध वर्षांच्या प्रश्नपत्रिका काढण्याचे काम देण्यात येते. प्रत्येक विषयाच्या तीन प्रश्नपत्रिका तयार करणे अपेक्षित असते. त्यानंतर या प्रश्नपत्रिका विद्यापीठाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येतात. परीक्षेच्या आधी या प्रश्नपत्रिका स्कॅन करून त्याला विशिष्ट संकेतांक देण्यात येतो. तो संकेतांक परीक्षा विभागातील काही अधिकारी, परीक्षा नियंत्रक यांनाच माहीत असतो. परीक्षेपूर्वी एक तास तो संकेतांक महाविद्यालयांच्या प्राचार्याना आणि परीक्षा नियंत्रकांना पाठवण्यात येतो. त्यानंतर पासवर्डचा वापर करून या प्रश्नपत्रिका महाविद्यालय उघडते आणि त्या छापून विद्यार्थ्यांना वाटल्या जातात. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच काही तास प्रश्नपत्रिका मिळत होत्या. त्यामुळे या प्रश्नपत्रिका वरिष्ठ पदावरूनच फुटत असल्याची चर्चा आहे.
विद्यापीठाच्या परीक्षेची कार्यशैली वरकरणी चोख दिसत असली, तरी या वर्षी परीक्षांमध्ये त्याला हरताळ फासल्याचेच समोर आले आहे. या वर्षी अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या तीन संचांच्या ऐवजी एकच संच विद्यापीठाकडे देण्यात आला होता. त्याचबरोबर काही परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अगदी परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत विद्यापीठाकडे आल्या नव्हत्या. या सर्व बाबींकडे विद्यापीठाकडून झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम आता विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका फुटण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. विद्यापीठाची व्यवस्थापन विद्याशाखेची परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे.. परीक्षा देणार नाही
व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रथम वर्षांमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका फुटत असल्याचे समोर आणले आहे. या विद्यार्थ्यांने त्याच्या उत्तरपत्रिकेत ‘या विषयाची प्रश्नपत्रिका फुटली आहे. त्याचा निषेध म्हणून ही परीक्षा देणार नाही..’ असे लिहून कोरीच उत्तरपत्रिका दिली आहे. या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून रविवारी चौकशी करण्यात आली. याबाबत या विद्यार्थ्यांने सांगितले, ‘मी अभ्यास करून परीक्षा देतो. मात्र, या वर्षी सर्वच विषयाच्या प्रश्नपत्रिका पहिल्या दिवसापासून व्हॉट्स अॅपवर मिळत आहेत. मात्र, हातात पुरेसे पुरावे नसल्यामुळे या बाबत तक्रार केली नाही. पुरावे आल्यानंतर मी तक्रार केली आहे.’
चौकशी करू – कुलगुरू
व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चेबाबत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले, ‘‘ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार निदर्शनास आणून दिला त्यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे. विद्यापीठाकडून याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सर्व तपास झाल्यानंतर परीक्षा पुन्हा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा