राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांच्या तारणहार ठरलेल्या खासगी संस्थांच्या समाईक परीक्षेचे हे शेवटचे वर्ष असणार आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी खासगी संस्था आणि संघटनांकडून घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षा पुढील वर्षीपासून बंद होणार आहेत.
राज्यात व्यवस्थापन अभ्यासक्रमाची (एमबीए, एमएमएस) प्रवेश प्रक्रिया ही राज्याची समाईक प्रवेश परीक्षा (सीईटी), आयआयएमकडून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा (कॅट), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा (सीमॅट) यांसह खासगी संस्था आणि संघटनांकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून करण्यात येते. सीईटी, कॅट, सीमॅटच्या माध्यमातून प्रवेश झाल्यानंतर उरलेल्या जागा या खासगी प्रवेश परीक्षांच्या माध्यमातून भरण्यात येतात. सध्या मॅट, सॅट, अॅटमा, अमी या प्रवेश परीक्षांना तंत्रशिक्षण संचालनालयाने मान्यता दिली आहे.
गेली काही वर्षे आपल्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या राज्यातील व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांना खासगी परीक्षांनी थोडासा दिलासा दिला होता. परीक्षेची पातळी ठरवणे, मूल्यांकन हे सर्वच संस्था आणि संघटनांच्या पातळीवर असल्यामुळे विद्यार्थी मिळवून देण्याचा खात्रीचा मार्ग म्हणून संस्था या परीक्षांकडे पाहत होत्या. मात्र, महाविद्यालयांना हा दिलासा आता या वर्षांपुरताच मिळणार आहे. राज्याने नुकत्याच लागू केलेल्या प्रवेश आणि शुल्क नियंत्रणाच्या अध्यादेशानुसार संघटनांकडून घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षांना बंदी घालण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा घेण्यासाठी शासनाकडून स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातूनच प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पुढील वर्षांपासून ही तरतूद अमलात येणार आहे. इतर तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांपेक्षाही व्यवस्थापन अभ्यासक्रम संस्थांना या तरतुदीचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा