पुणे : व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (एमबीए, एमएमएस) अभ्यासक्रमाच्या पुनर्परीक्षेसाठी १३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ३० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ घेतली जाणार असल्याने एमबीए, एमएमएस सीईटी आता ३० एप्रिलऐवजी ६ मे रोजी घेतली जाणार आहे.
एमबीए, एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) २५ आणि २६ मार्च रोजी राज्य सीईटी सेलमार्फत राज्यभरात ऑनलाइन पद्धतीने राज्यातील १९१ केंद्रांवर घेण्यात आली. मात्र तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता आली नाही. काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याने यंत्रणाच बंद पडली होती. तर काही ठिकाणी सर्व्हरला अडचणी आल्याने विद्यार्थ्यांना सीईटी देता आली नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी जोर धरू लागली.
विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन राज्य सीईटी सेलने चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीच्या अहवालानुसार तांत्रिक अडचणींमुळे सीईटी देता न आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी देण्यासाठी पुनर्परीक्षेची घोषणा करण्यात आली. संबंधित विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ११ एप्रिलची मुदत देण्यात आली. त्यानुसार १३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
एमबीए, एमएमएस सीईटी ३० एप्रिलला घेण्यात येणार होती. मात्र ३० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ घेतली जाणार असल्याने एमबीए, एमएमएस सीईटी आता ३० एप्रिलऐवजी ६ मे रोजी सकाळी नऊ ते साडेअकरा या वेळेत घेतली जाणार असल्याची माहिती सीईटी सेलने परिपत्रकाद्वारे दिली आहे.