कर्वेनगर भागात नुकतीच एक घटना घडली. पादचारी ८३ वर्षीय ज्येष्ठ महिलेकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावले आणि मंगळसूत्राचा अर्धवट भाग त्याच्या हातात आला. त्यानंतर दुचाकीस्वार चोरटा पुन्हा वळला. त्याने ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राचा अर्धवट भाग हिसकावला. ज्येष्ठ महिलेला धक्का देऊन तो पसार झाला. समाज माध्यमात ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर सामान्य पुणेकरांच्या अंगावर काटा आला आणि त्याचे पडसाद उमटले. या घटनेची गंभीर दखल पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली. चोरट्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार त्यांनी दिला. पोलीस आयुक्तांच्या या घोषणेचे स्वागत करण्यात आले. अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या चोरट्यांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करून त्यांना जरब बसवावी, अशी अपेक्षाही साामान्यांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंधरा ते वीस वर्षांपूर्वी पुण्यासह मुंबई, ठाणे शहरात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. दिवसभरात किमान पाच ते सहा साखळी चोरीच्या घटना पुणे शहरात घडतात. सणासुदीला तर साखळी चोरीच्या १५ ते २० घटना घडायच्या. निर्जन रस्त्यावर महिलांना लक्ष्य करून दुचाकीस्वार चोरटे भरधाव वेगाने पसार व्हायचे. त्या वेळी शहरात मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नव्हते. सकाळी फिरायला जाणाऱ्या, मंदिरात, तसेच बाजारात खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून चोरटे काही क्षणांत दागिने चोरून पसार व्हायचे.

साखळी चोरट्यांची दहशत एवढी वाढली होती, की निर्जन रस्त्यावर पोलिसांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. सकाळी फिरायला जाणेही बंद करण्यात आले. गस्त घालूनही साखळी चोरीचे गुन्हे कमी होत नव्हते. पोलिसांनी पुणे, अंबरनाथ, तसेच लोणी काळभोर परिसरातील चोरट्यांची धरपकड सुरू केली. संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या चोरट्यांनी गुन्हे केल्याची कबुली दिल्यानंतर त्यांना अटकही केली जायची. मात्र, त्या वेळी साखळी चोरीचा गुन्हा दाखल करताना चोरीचे कलम लावले जायचे. चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयाकडून त्यांना जामीन मिळायचा. त्यानंतर पुन्हा साखळी चोरीचे गुन्हे करण्यास चोरटे मोकळे व्हायचे. नेमकी ही बाब पुण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी हेरली. मुंबई गुन्हे शाखेत काम केलेले आणि संघटित गुन्हेगारीचा बिमोड करण्यास महत्त्वाची कामगिरी करणारे सिंह यांनी साखळी चोरांना जरब बसविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. त्यांनी साखळी चोरीचा गुन्हा दाखल करताना जबरी चोरीचे कलम लावण्याचे आदेश दिले. या कलमाचा वापर केल्याने चोरट्यांना जामीन मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या. साखळी चोरट्यांनी पुणे, मुंबई, ठाण्यासह देशभरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यांनी दागिने चोरीच्या गुन्ह्यातून लाखो रुपये कमावले होते. या पैशांमधून त्यांनी लोणी काळभोर भागात बंगले बांधले होते. साखळी चोरीचे गुन्हे संघटितपणे करून त्यांना स्थावर जंगम मालमत्ता उभी केली.

त्यामुळे डॉ. सिंह यांनी साखळी चोरट्यांविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाईचा निर्णय घेतला आणि तशी कारवाईही सुरू केली. संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील कठोर तरतुदींचा वापर केल्याने साखळी चोरट्यांना जामीन मिळण्यास अडचण निर्माण झाली. ‘मकोका’ नुसार कारवाई केल्यानंतर किमान दोन ते चार वर्ष जामीन मिळत नसल्याने चोरट्यांना जरब बसली आणि पोलिसांच्या कठोर कारवाईचा संदेशही चोरट्यांपर्यंत पोहोचला. डॉ. सिंह यांची मात्रा लागू पडली आणि साखळी चोरीचे गुन्हे कमी होण्यास मदत झाली. गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारचे गुन्हे कमी झाले. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांत पुणे शहरात महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना पुन्हा वाढीस लागल्या. महिलांना धक्का देऊन दागिने हिसकाविणाऱ्या साखळी चोरट्यांची मुजोरीही दिसून आली. त्यामुळेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी साखळी चोरट्यांविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिला. चोरट्यांविरुद्ध ‘मकोका’ कारवाई करू, असा इशारा त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. अमितेश कुमार यांची ही घोषणा आश्वस्त करणारी ठरली असून, चोरट्यांविरुद्ध जरब बसविणारी कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

rahul.khaladkar@expressindia.com