लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे स्टेशनजवळील ताडीवाला रस्ता भागात दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रितेश कुमार यांनी आतापर्यंत शहरातील ४४ गुंड टोळ्यांविरुद्ध कारवाई केली आहे.
संघर्ष उर्फ भाव्या नितीन आडसुळ (वय २१), साहील राजू वाघमारे उर्फ खरखर सोन्या (वय २२), अतुल श्रीपाद म्हस्कर उर्फ सोनू परमार (वय २२, तिघे रा. ताडीवाला रस्ता, पुणे स्टेशन) अशी कारवाई करण्यात आलेल्या गुंडांची नावे आहेत. गेल्या महिन्यात आडसुळ आणि साथीदारांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली होती. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी आडसुळ, त्याचे साथीदार वाघमारे, म्हस्कर यांना अटक करण्यात आली होती. आडसुळ, वाघमारे, म्हस्कर यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे चार गुन्हे दाखल आहेत.
आणखी वाचा-पुणे: मार्केट यार्डात व्यावसायिकाच्या बंगल्यात चोरी, १५ लाखांचा ऐवज चोरट्यांकडून लंपास
त्यांनी ताडीवाला रस्ता भागात टोळी तयार करुन दहशत माजविली होती. या टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी आडसुळ टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचे आदेश दिले.