पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर भागात टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार प्रवीण सिद्राम मडीखांबेसह बारा साथीदारांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे आदेश दिले. मुंढवा आणि लोणी काळभोर भागात पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईत चोरलेले ४८ लाख रुपयांचे पेट्रोल, डिझेलसह टँकर जप्त केला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मडीखांबे (रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) याच्यासह शुभम सुशील भगत (वय २३, रा. बोरकरवस्ती, थेऊरफाटा, ता. हवेली), तृशांत राजेंद्र सुंभे (वय २३, रा. बँक ऑफ बडोदाजवळ, थेऊरु फाटा) रवी छोटेलाल केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती, माळीमळा, ता. हवेली), विशाल सुरेश गोसावी (वय ३० रा. वाणीमळा, थेऊर फाटा), कृष्णा उर्फ किरण हरिभाऊ आंबेकर (वय ३१ रा. कदमावाक वस्ती), रोहितकुमार छेदूलाल (वय २५, रा.बोरकरवस्ती, माळीमळा), अभिमान उर्फ सुभाष सुरेश ओव्हाळ (वय ३५, माळीमळा, लोणी काळभोर), पांडुरंग निळकंठ नकाते (वय ४२, रा. माळीमळा, लोणी काळभोर), आकाश सुखदेव घोडके (वय २४, रा. हनुमाननगर, कोथरूड), तेजस तुकाराम वाघमारे (वय २३, रा. श्रावणधारा वसाहत, कोथरूड), तसेच टँकरचालक अशी मोक्का कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मडीखांबे हा पसार झाला आहे.

हेही वाचा – पुणे, पिंपरी चिंचवडसह उपनगराला जोरदार पावसाने झोडपले

लोणी काळभोर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाट्याजवळ एका पत्र्याच्या खोलीजवळ टँकर थांबला असून, त्यातून डिझेल चोरले जात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, ढमढेरे, शिवाजी जाधव यांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे छापा टाकून एक हजार ६२० लिटर डिझेल जप्त केले होते. त्यानंतर लोणी काळभोर पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनी मडीखांबे आणि साथीदारांविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्याकडे सादर केला होता. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली.

हेही वाचा – पुणे : पिस्तूल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात, कात्रज भागात पोलिसांची कारवाई

चोरीतून कोट्यवधींची संपत्ती

लोणी काळभोर भागात पेट्रोल-डिझेल कंपन्यांचे आगार आहे. तेथून पेट्रोल-डिझेल टँकरमध्ये भरून वितरित केले जाते. आरोपी प्रवीण मडीखांबे आणि साथीदारांनी टँकरचालकांशी संगनमत करून पेट्रोल-डिझेल चोरीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. मडीखांबेने चोरीतून कोट्यवधींची संपत्ती कमाविली. लोणी काळभोर भागात त्याने इमारत बांधली, वाहने खरेदी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mcoca action against oil mafia praveen madikhambe and accomplices in loni kalbhor crores of wealth from petrol diesel theft pune print news rbk 25 ssb