लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : तरुणाचे अपहरण करुन त्याला डांबून ठेवणाऱ्या वारजे भागातील गुंड पपुल्या वाघमारे टोळीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश दिले. वाघमारे आणि साथीदारांनी मंगळवारी पहाटे तळजाई वसाहत परिसरात २६ वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली होती.
टोळी प्रमुख पपुल्या उर्फ दिग्विजय तुकाराम वाघमारे (वय १९, रा. दत्तनगर, सुभाष बराटे चाळ, रामनगर, वारजे माळवाडी), राहुल विठ्ठल वांजळे (वय २४, रा. अहिरेगाव), मारोती उर्फ मारत्या पांडुरंग टोकलवाड (वय १९, रा. वारजे), हर्षद उर्फ बाब्या संतोष वांजवडे (वय १९ रा. वारजे) यांच्यासह पाच साथीदारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. वाघमारे आणि साथीदारांनी वारजे भागात दहशत माजविली होती. वाघमारे आणि साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. वारजे भागातील एका तरुणाचे अपहरण करुन त्याला डांबून मारहाण केली होती. मंगळवारी पहाटे वाघमारे टोळीने पद्मावती भागातील तळजाई वसाहतीत वाहनांची तोडफोड केली होती.
आणखी वाचा-पिंपरी: ‘एमआयडीसीतील’ कामगारांना आता रात्रपाळीत मिळणार शिक्षण
वाघमारे टोळीविरुद्ध मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेचे निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी तयार केला होता. अतिरिक्त आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त सुहेल शर्मा यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशाने वाघमारे टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत शहरातील २८ गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.