पुणे : राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पावसाचा मुक्काम आणखी वाढणार आहे. शुक्रवारपर्यंत (२४ मे) मराठवाडा, विदर्भात सर्वांत अधिक अवकाळी पाऊस पडणार असून, मध्य महाराष्ट्रातील काही भागात गारपीट, तर कोकणात गरमी आणि आर्द्रता वाढणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईशान्य राजस्थानपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यत द्रोणीय स्थिती कार्यरत असून, त्याची तीव्रता कायम आहे. याशिवाय मराठवाडा ते तामिळनाडूपर्यंत (कर्नाटक पार करून ) द्रोणीय स्थिती असून, त्याचा प्रभाव वाढला आहे. या स्थितीमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. या भागात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे.

हेही वाचा >>> पुणे:शहराच्या पूर्व भागाला पावसाने झोडपले; १५-२० ठिकाणी झाडपडीच्या घटना

राज्यातील कमाल तापमानात घट झाली आहे. तरीदेखील उकाडा आणि उष्णतेच्या झळा कायम आहेत. राज्यात शनिवारी जळगाव येथे सर्वाधिक ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट आणि आर्द्रता कायम राहणार आहे. मात्र, या भागात दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील अवकाळी पाऊस कमी झाला आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत या भागातील काही जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता आहे किंवा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अवकाळी सुरू असल्यामुळे बहुतांश भागातील कमाल तापमान ४० अंशांच्या खाली आले आहे. तरीदेखील दुपारपर्यंत कडक ऊन, दुपारनंतर पावसाची हजेरी, तर रात्रभर उकाडा अशी स्थिती कायम आहे.

हेही वाचा >>> मुंबई, मेाशीनंतर पुण्यातही होर्डिंग कोसळले; बँड पथकातील घोडा जखमी

“यलो अलर्ट” कोणत्या जिल्ह्यांना?

नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ – (२४ मेपर्यंत), तर जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली (पुढील दोन दिवस) मोसमी वाऱ्यांना अनुकूल स्थिती अनुकूल स्थितीमुळे मोसमी वारे येत्या ४८ तासांत दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे, तसेच बंगालच्या उपसागरातील वायव्य बेटांवर दाखल होतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य बंगालच्या उपसागरात २२ मे रोजी कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे, तर २४ मे रोजी बंगालच्या उपसागरातील याच कमी दाबाचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. ते मध्यपूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत असणार आहे. या दोन्ही स्थिती मोसमी वारे दाखल होण्यास अनुकूल आहेत. या स्थितीची तीव्रता कायम राहिल्यास केरळमध्ये वेळेपूर्वीच मोसमी वारे दाखल होतील, असाही हवामान विभागाचा अंदाज आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Md predicted unseasonal rain hailstorm in maharashtra pune print news psg 17 zws