औषधांचा खर्च न परवडल्यामुळे उपचार अर्धवट सोडून देणाऱ्या रुग्णांमध्ये साध्या क्षयरोगाचे रूपांतर ‘मल्टी ड्रग रेझिस्टंट’ म्हणजे औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगात होण्याचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी २०१२ ते ऑगस्ट २०१३ या कालावधीत पुणे ग्रामीण परिसरात (बारा तालुक्यांमध्ये) मल्टि ड्रग रेझिस्टंट क्षयरोगाचे तब्बल १९४ रुग्ण आढळले आहेत. तसेच वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्याकडे उपचार घेणाऱ्या क्षयरोगाच्या रुग्णांची माहिती सरकारला कळवणे बंधनकारक असूनही त्याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे उघड झाले आहे.  
सरकारच्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत रुग्णांना ‘डॉट्स’ या औषधांचा डोस पूर्ण करायचा असतो. ही औषधे प्रभावी असून त्यांचा डोस रुग्णांना मोफत दिला जातो. परंतु सरकारी औषधांवर विश्वास नसल्यामुळे बहुसंख्य रुग्ण खासगी वैद्यकीय व्यावसायिकांकडेच उपचार घेण्यास प्राधान्य देत असल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. शोभा राजुरे यांनी सांगितले.  त्या म्हणाल्या, ‘‘सरकारी उपचार न घेणाऱ्या रुग्णांपैकी औषधांच्या किमती न परवडल्यामुळे अर्धवट औषधे घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. औषधांचा डोस पूर्ण न केल्यामुळे एमडीआर क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. या रुग्णांना पुन्हा उपचार घेताना २४ ते २७ महिन्यांचे उपचार घ्यावे लागतात. क्षयरोग बरा न झाल्यामुळे तो रुग्ण आधीच त्रस्त झालेला असतो. त्यामुळे त्याने उपचार घ्यावेत यासाठी समुपदेशनाची गरज भासते. एमडीआर क्षयरोगातही उपचारांचा डोस पूर्ण न केल्यास त्याचे रूपांतर आणखी गुंतागुंतीच्या ‘एक्सट्रीम मल्टि ड्रग रेझिस्टंट’ (एक्सडीआर) क्षयरोगात होते. गेल्या एका वर्षांत पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये एक्सडीआर क्षयरोगाचे तीन रुग्ण आढळले आहेत.’’
जानेवारीपासून आतापर्यंत पुणे ग्रामीण परिसरात थुंकीवाटे पसरणाऱ्या क्षयरोगाचे ११२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर उपचार अर्धवट सोडल्यामुळे पुन्हा उपचारांची गरज भासलेल्या रुग्णांची संख्या ३४४ आहे. थुंकीवाटे न पसरणाऱ्या क्षयरोगाचेही ३४४ रुग्ण सापडले असून फुफ्फुसांच्या क्षयरोगाव्यतिरिक्त इतर क्षयरोगांचे २५७ रुग्ण आढळले आहेत. क्षयरोगातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वर्षांच्या पहिल्या चार महिन्यांपेक्षा दुसऱ्या चार महिन्यांत वाढली आहे. एप्रिलअखेर हा ‘क्युअर रेट’ ८७ टक्के होता तर ऑगस्टअखेर तो वाढून ८९ टक्के झाला आहे.  

Story img Loader