द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने ९५ व्या ऑस्करसाठी जाहीर केलेल्या जगभरातील ३०१ चित्रपटांमध्ये ‘मी वसंतराव’ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. या घटनेचा मला मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आणि या चित्रपटाचे निर्माते राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- राज्य गारठले; उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा
यानिमित्ताने आम्ही केलेल्या कामाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात आहे, ही अभिमानाची बाब आहे. शिवाय मराठी चित्रपट आणि संगीत सृष्टीसाठी देखील हे महत्त्वाचे आहे. ‘मी वसंतराव’ चित्रपटामध्ये माझे आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांचीच कथा मी एक नट म्हणून रसिकांसमोर घेऊन आलो आहे. इतकेच नव्हे तर त्यातील गाणी आणि संगीतदिग्दर्शन हे देखील मी स्वत:च केले असल्याने हा चित्रपट अनेकार्थाने माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. आजच्या या नामांकनाने मला खूप आनंद झाला आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.