महाराष्ट्रातील दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेता महात्मा फुले मंडई परिसरातील एका स्थानिक गणेश मंडळाने दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दररोज दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल मंडई मंडळ गेली तीस वर्षांपासून पुणे परिसरात झुणका भाकर केंद्र चालवत आहे. या झुणका भाकर केंद्रावर ही सेवा दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. पुणे परिसरातील अनेक महाविद्यालयांमध्ये दुष्काळग्रस्त विभागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. या विद्यार्थ्यांना सदर झुणका भाकर केंद्रावर आपले महाविद्यालयीन ओळखपत्र दाखवावे लागेल आणि त्यांना दररोज अवघ्या दहा रुपयांत जेवण मिळेल अशी सुविधा मंडळामार्फत करण्यात आली आहे.
“घरावर दुष्काळाचे संकट ओढावल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांना दर महिन्याला पैसे पाठवणे कठीण जाते. त्यामुळी ही परिस्थिती लक्षात घेत आम्ही अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला. यामागे विद्यार्थ्यांना मदत आणि त्यांच्या कुटूंबाला दुष्काळावर मात करण्याचे प्रोत्साहन मिळावे हाच यामागचा हेतू आहे” असे मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी स्पष्ट केले.

Story img Loader