Measles Cases in Pune गेल्या सुमारे महिनाभरापासून राज्याच्या विविध भागांत गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. प्रामुख्याने मुंबई आणि परिसरात असलेले रुग्ण पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये आढळून आले होते. मात्र, आता पुणे महापालिका क्षेत्रातील दाट लोकवस्तीच्या काही भागांमध्ये सुमारे ११ बालकांना गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.
हेही वाचा- ‘घाशीराम कोतवाल’चा मूळ संचातील दुर्मीळ प्रयोग आजपासून यूटय़ूबवर
पुणे शहराच्या भवानी पेठ, लोहियानगर, कोंढवा अशा दाट लोकवस्तीच्या काही भागांमध्ये ११ मुलांना गोवर संसर्ग असल्याचे आढळून आले आहे. गोवर झालेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीला ताप येणे, शरीरावर लाल पुरळ येणे, डोळे लाल होणे ही लक्षणे दिसतात. गोवरच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यानंतर सात ते दहा दिवसांनी ही लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. सुरुवातीला केवळ ताप आणि खोकला, सर्दी, डोळे लाल होणे अशी असलेली लक्षणे हळूहळू वाढतात आणि दोन-चार दिवसांमध्ये अंगभर पुरळ येतो. तो कानाच्या मागे, चेहरा, छाती, पोटावर पसरतो. या टप्प्यावर योग्य खबरदारी घेतली असता आजाराची गुंतागुंत वाढण्यापासून थांबता येते. मात्र, गोवर बरा झाल्यानंतरही काही काळ मुलांमध्ये अशक्तपणा, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे हे सर्रास दिसून येते. हे टाळण्यासाठी मुलांना अ जीवनसत्त्व देणे, घरचे ताजे पौष्टिक जेवण देणे आवश्यक असल्याचे गोवर नियंत्रक कृती दलाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा- पुणे: डॉ. बाबा आढाव यांची रिक्षा पंचायतही दुचाकी टॅक्सीच्या विरोधात सक्रीय
११ मुलांना सौम्य लक्षणे
पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, गोवर बाधित मुले ही प्रामुख्याने कोंढवा, लोहियानगर, भवानी पेठ अशा दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये आहेत. मुलांची लक्षणे सौम्य आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. महापालिका आरोग्य विभागाने गोवर लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. लहान मुलांना गोवरची लस देण्यात येत असून आधी लस घेतलेल्या मुलांचेही या मोहिमेत लसीकरण करण्यात येत आहे.
हेही वाचा- पिंपरी: फ्लॅट देण्याच्या बहाण्याने तीन कोटींची फसवणूक करणारा भामटा गुंडाला अटक
राज्याच्या गोवर कृती दलाचे सदस्य आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग म्हणाले, लसीकरणाचे प्रमाण करोना पूर्व लसीकरणाच्या प्रमाणाला पोहोचेपर्यंत मुलांमधील विषाणूजन्य आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. गोवर लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या मुलांना आजारापासून ९७ टक्के पर्यंत संरक्षण मिळते. लसीकरणाचे प्रमाण ९५ टक्के पेक्षा अधिक होईपर्यंत मुलांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असेही डॉ. जोग यांनी स्पष्ट केले.