पुणे : नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मेट्रोचे सर्वत्र पडलेले साहित्य आणि राडारोडा तातडीने उचलून रस्ता मोकळा करणे, पदपथ सुस्थितीत करणे, शक्य तिथे रस्त्याचे रुंदीकरण करणे, तसेच बस आणि अवजड वाहने उड्डाणपुलावरुनच जातील अशी व्यवस्था करण्याबरोबरच वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या बसथांब्यांच्या जागा तातडीने बदलणे आणि नळस्टॉप चौकातील सिग्नलच्या वेळेचे नियोजन करणे ही कामे तातडीने करण्याच्या सूचना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी संबंधितांना दिल्या. येत्या दहा दिवसांत या उपाययोजनांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी नळस्टॉप चौकात पाहणी दौरा केला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, माधुरी सहस्त्रबुद्धे, वाहतूक प्रकल्प विभागाचे श्रीनिवास बोनाला, मेट्रोचे गौतम बिऱ्हाडे, महापालिका पथ विभागाचे अभिजीत डोंबे, वाहतूक पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, कर्वे रस्ता व्यापारी संघाचे ओमप्रकाश रांका, राजू भटेवरा, भाजप युवा मोर्चाचे दुष्यंत मोहोळ यावेळी उपस्थित होते.
दीर्घकालीन उपाययोजनेत बालभारती पौंड फाटा रस्ता झाल्यावर, कोथरूडकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. हे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाशी सतत संपर्कात आहोतच, मात्र तोपर्यंत नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी सर्व बाजूने विचार करुन अनेक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि मेट्रो मार्गिकेसाठी दुमजली उड्डाणपूल (डबल डेकर) बांधण्यात आला असला तरी दुहेरी उड्डाणपुलाखालून जाणारा कर्वे रस्ता अरूंद झाल्याने नळस्टॉप ते एसएनडीटी महाविद्यालयापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपुलावरील वाहतूक वेगवान झाली असली तरी पुलाखाली वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने वाहनचालकांना कोंडीतून मार्ग काढावा लागत आहे. उड्डाणपुलामुळे नळस्टॉप चौक ते एसएनडीटी महाविद्यालया दरम्यान असलेल्या कर्वे रस्त्यावरील दोन मार्गिका पूर्णपणे व्यापल्या गेल्या असून वाहनचालकांच्या वापरासाठी सहा ते आठ फूट रुंदीचा रस्ता राहिला आहे.
नळस्टॉप चौक ते एसएनडीटी महाविद्यालय रस्त्यावर पीएमपी थांबा आहे. पीएमपी बस थांब्यावर थांबल्यानंतर वाहतूक कोंडी होती तसेच एकापाठोपाठ दोन ते तीन पीएमपी बस कर्वे रस्त्याने गेल्यास कोंडीत भर पडते. बस थांब्यावर थांबणारे प्रवासी तसेच पादचाऱ्यांना या भागातून चालणे देखील अवघड झाले आहे. पदपथ अरूंद असल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून उड्डाणपुलाखालील रस्त्यावरून जावे लागते.
नळस्टॉप चौकातील कोंडीवर उपाययोजना ;विविध पर्यायांची अंमलबजावणी तातडीने
नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी नळस्टॉप चौकात पाहणी दौरा केला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 26-04-2022 at 01:47 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measures taken nalstop chowk immediate implementation various options amy