पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खराब झालेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रणास मदत म्हणून वाहतूक नियंत्रकांची नेमणूक करून वाहतूक शाखेकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच पीएमआरडीएकडून बाणेर, गणेशखिंड रस्त्यावर वाहने उभी करणे, थांबविणे याला बंदी घालण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यापीठ चौकातील काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी रस्त्याचे बांधकाम करणे, अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे आदी कामे पीएमआरडीए कडून हाती घेण्यात आली आहेत. पुण्याचे पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांनी गेल्या आठवड्यात या रस्त्याची पाहणी केली होती. यामध्ये ज्या ठिकाणी प्रत्यक्षात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू नाही अथवा काम सुरू करण्यास अवधी आहे, अशा ठिकाणचे अडथळे रस्त्याच्या मध्यभागी घ्यावेत आणि काम सुरू करण्याच्या अगोदर पुन्हा बाहेर घ्यावेत, जेणेकरून अस्तित्वातील वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पीएमआरडीए आणि पुणे मनपाच्या प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.

हेही वाचा: श्वानाने सार्वजनिक ठिकाणी घाण केल्यास मालकाला ५०० रुपये दंड; पुणे महापालिकेडून कारवाई सुरू

या दरम्यान पीएमआरडीएमार्फत मेट्रो कंत्राटदारास दिलेल्या सुचनेनुसार मेट्रो कंत्राटदाराने बाणेर गाव हद्दीमध्ये ज्या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे अशा ठिकाणी किमान आवश्यक असलेल्या रुंदीस अडथळे उभा करून उर्वरित भागातील अडथळे रस्त्याच्या मध्यभागी घेतले वा अडथळ्यांची रुंदी कमी केली आहे. बालेवाडी ते शिवाजीनगर या लांबीमध्ये मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी नऊ मीटर रुंदीने अडथळे लावण्यात आले आहेत.

हेही वाचा: वाढलेली महागाई तुलनात्मकदृष्टय़ा कमीच -बावनकुळे

मेट्रो प्रकल्प ४० महिन्यांत पूर्ण करण्याचे बंधन
करारनाम्यानुसार मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने मेट्रो प्रकल्प ४० महिन्यात पूर्ण करण्याचे बंधन आहे. त्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे बांधकाम करण्यासाठी आवश्यक असलेली जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी मेट्रोचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणचे अडथळे किमान आवश्यक रुंदीपेक्षा अजून रस्त्याच्या मध्यभागी घेणे शक्य नसल्याचे पीएमआरडीए, मेट्रो कंत्राटदार कंपनी यांच्याकडून पुणे महापालिकेच्या उपस्थित अधिकाऱ्यांना प्रत्यक्षात दाखविण्यात आले आहेत, अशी माहिती पीएमआरडीएने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measures will be taken by pmrda to avoid traffic congestion pune print news tmb 01