शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता आणि त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न सातत्याने ऐरणीवर येत असल्याने शहरात स्वच्छ, टापटीप आणि यांत्रिकी पद्धतीवर आधारित स्वच्छतागृहे (ई-टाॅयलेट्स) उभारण्यात आली असली तरी प्रशासकीय अनास्थेमुळे बहुतांश ई-टाॅयलेट्स बंद असल्याची वस्तुस्थिती आहे. तीन वर्षापासून या स्वच्छतागृहांचा वापर होत नसून महापालिकेकडून ती सुरू करण्यासंदर्भातील करारही करण्यात आलेला नाही.
खासदार निधीतून शहरात अकरा ठिकाणी ही सुविधा महापालिकेडून देण्यात आली. माजी खासदार अनिल शिरोळे यांनी त्यासाठी खासदार निधी दिला होता. जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानालगत पहिले स्वच्छतागृह उभारण्यात आले. सध्या या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने काॅईन बाॅक्सची मोडतोड केली आहे. अनेक ठिकाणी सेन्सर काम करत नसल्याचे अस्वच्छता निर्माण झाली आहे. सध्या कोणतीही देखभाल आणि दुरुस्ती नसल्याने सर्व ई-टॉयलेट बंद आहेत. त्याला महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडूनही दुजोरा देण्यात आला.
हेही वाचा >>>पुणे : शहरातील २२५ रस्ते निकृष्ट ; २५ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा पथ विभागाचा प्रस्ताव
ई-टॉयलेट्सची सुविधा पुन्हा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली होती. एका कंपनीकडून तंत्रज्ञान बदलून ती सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेला देण्यात आला. मात्र त्यावर महापालिकेने अद्यापही निर्णय घेतलेला नाही. जुने तंत्रत्रान बदलून नवे तंत्रज्ञान वापरणे किंवा सध्याच्या स्वच्छतागृहांची दुरूस्ती करणे असे दोन पर्याय महापालिका प्रशासनाकडे आहेत. त्यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.
हेही वाचा >>>पुण्यात भंगारच्या गोडाऊनला भीषण आग; सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची शक्यता
मानवविरहित आणि स्वयंचलित प्रणाली ही स्वच्छतागृहांची वैशिष्ट्ये आहेत. स्वच्छतागृहाचा वापर करण्यासाठी नाणे (कॉईन) टाकल्यानंतरच त्याचा वापर करता येणार आहे. स्वच्छतागृहाचा वापर झाल्यानंतर तत्काळ त्याची साफसफाई यंत्राद्वारे होणार असून साफसफाई झाल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही. त्यामुळे स्वच्छतागृहांमधील स्वच्छता आणि साफसफाई कायम राहण्यास मदत होणार आहे. एका खासगी कंपनीकडून या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र रॅम्प आणि लोखंडी बारची यामध्ये व्यवस्था आहे. शहरातील जंगलीमहाराज रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, मॉडेल कॉलनी, हिरवाई गार्डन या उच्चभ्रू भागाबरोबरच भैरोबा नाला, गोखलेनगर, रामोशी वस्ती, कामगार पुतळा, कर्वेनगर येथील मावळे आळी आणि दांडेकर पूल वसाहतीजवळ या प्रकारच्या स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आलेली आहे.