गणेश यादव
पिंपरी : शहरातील १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे मोठे रस्ते, मंडई, इतर मोकळ्या जागा यांत्रिकी पद्धतीने साफसफाईला सुरुवात झालेली नाही. आता दिवाळीनंतरचा मुहूर्त प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर तरी यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाईच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेमार्फत शहरातील रस्ते यांत्रिकी पद्धतीने साफसफाईचे कामकाज करण्यात येते. निविदा प्रक्रियेद्वारे डी. एम. एंटरप्रायजेस आणि बी.व्ही.जी. इंडिया या दोन संस्थांना काम दिले होते. त्यांची मुदत संपल्यानंतर २०२० मध्ये १८ मीटर व त्यावरील रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने साफसफाईसाठी विभागनिहाय दर मागविण्यात आले. शहराचे दक्षिण आणि उत्तर असे दोन भाग करून चार पॅकेजमध्ये हे काम केले जाणार आहे. दक्षिण भागासाठी ३३१ किलोमीटर अंतराचे आणि उत्तर भागासाठी ३३९.१५ किलोमीटर अंतराचे मोठे रस्ते आहेत. त्यामध्ये शहरातील महामार्ग, बीआरटीएस मार्ग, १८ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते तसेच मंडई व इतर मोकळ्या जागांचा समावेश आहे. प्रत्येक भागासाठी १६ मोठी वाहने, १६ इतर वाहने आणि ५५ कर्मचारी असणार आहेत. १६ वाहनांमार्फत प्रत्येकी ४० किलो मीटर रस्ते साफ केले जाणार आहेत.
आणखी वाचा-पुणे : विवाहाच्या आमिषाने तरुणाला २२ लाखांचा गंडा, तरुणीसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
रस्ते सफाईची निविदा जुलै २०२२ मध्ये राबविली होती. एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यानंतरही प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले नाही. जूनमध्ये महापालिकेने चार एजन्सीला कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) दिला आहे. रस्ते साफ करणारी वाहने जर्मनी आणि इटलीतून आणली आहेत. शहरातील अंतर्गत रस्ते साफ-सफाईसाठी सद्यस्थितीत चार एजन्सी कार्यरत आहेत. यासाठी महापालिकेकडून दरमहा पाच कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
यांत्रिकी पद्धतीने रस्ते साफसफाईच्या वाहन नोंदणीची परिवहन कार्यालयाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या १५ दिवसांत यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून रस्ते साफ सफाईला सुरुवात होईल. -शेखर सिंह, आयुक्त