लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: पालकमंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यपद्धतीवर उघड भाष्य करत नाराजी व्यक्त करणाऱ्या कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला. मानापमानाच्या नाट्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एनडीए गेट (चांदणी चौक) चौक उड्डाणपूल लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती कुलकर्णी यांना केल्यानंतर त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी भेट दिली.

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमावरून भारतीय जनता पक्षातील श्रेयवाद उफळून आला. मेधा कुलकर्णी यांनी समाजमाध्यमातून नाराजी व्यक्त करताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर खरमरीत टीका केली होती. ‘चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या विषयात कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते सहभागी नव्हते. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सध्याचे नेते, माझ्यासारख्यांचे अस्तित्व मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी पाटील यांच्यावर शरसंधान साधल्यानंतर या नाराजीची चर्चा आणि त्याचे पडसाद शनिवारी दिसून आले.

आणखी वाचा-शरद पवार आणि अजित पवारांमध्ये पुण्यात गुप्त बैठक? राजकीय चर्चांना उधाण

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुलकर्णी यांना दूरध्वनी करून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर मेधा कुलकर्णी यांना स्थान देण्यात आले. उड्डाणपुलाच्या कामाची माहिती देताना नितीन गडकरी यांनी आवर्जून कुलकर्णी यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. कार्यक्रमानंतर गडकरी स्वत: त्यांच्या निवासस्थानी केले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

नितीन गडकरी यांनी निवासस्थानी भेट घेतली. मात्र ती राजकीय भेट नव्हती. कुटुंबीयांबरोबर त्यांनी काही काळ संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी भेटीसाठी वेळ देण्याचे आश्वासन दिले आहे. -मेधा कुलकर्णी, माजी आमदार, कोथरूड

खवय्या गडकरींसाठी पाणीपुरी, भेळपुरी

नाराज झालेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची समजूत काढण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेलेल्या नितीन गडकरी यांनी भेळपुरी, पाणीपुरी आणि खास ड्रायफ्रूटच्या लाडूचा आस्वाद घेतला.

Story img Loader