‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे मत
माध्यमांमध्ये लोकशाहीबद्दल जी चिंता व्यक्त केली जाते त्या चिंतेला माध्यमेच जबाबदार आहेत, असे मत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.
‘साहित्य शिवार’ दिवाळी अंकातर्फे ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवलकर यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ‘माध्यमे आणि लोकशाही’ या विषयावर कुबेर यांचे व्याख्यान झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार अध्यक्षस्थानी होते. सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, मराठवाडा मित्र मंडळाचे डॉ. भाऊसाहेब जाधव आणि ‘साहित्य शिवार’चे संपादक जयराम देसाई या वेळी उपस्थित होते.
कुबेर म्हणाले, माध्यमांनी भूमिका घेणं ही महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची परंपरा आहे. प्रश्न विचारणं हे माध्यमांचं काम आहे. ते काम माध्यमांकडून होताना दिसत नाही. लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार माध्यमं स्वत:हून विसरत चालली आहेत. आपल्या देशातील लोकांमध्ये कुठेतरी हुकूमशाहीविषयी सुप्त आकर्षण आहे. आपल्याला हुकूमशहाच हवा आहे हे जर नागरिकांना सार्वमताने वाटत असेल तर लोकशाहीचा अंत फार दूर नाही. खऱ्या लोकशाहीची सुरुवात कुटुंबापासून होते.
सत्ताधीश आणि देश एकच नसतात. सत्ताधीशनिरपेक्ष प्रेम देशावर करता येतं. सत्ताधीशांवर प्रेम आहे म्हणजे देशावर प्रेम आहे असही नाही. सत्तेच्या विरोधात असणाऱ्यांना देशाचा शत्रू ठरवणं हे लोकशाहीत दुर्दैवी आहे, असे कुबेर यांनी सांगितले. ते म्हणाले, कोणत्याही सरकारने घेतलेल्या निर्णयाचे माध्यमांनी तार्किक पद्धतीने मूल्यमापन करून प्रश्न विचारल्यास जर त्यांच्या देशभक्तीवरच शंका घेतली जात असेल आणि त्यामुळे वाचकांनाच आनंद होत असेल तर इथे त्या पत्रकारितेचा आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचे जे नागरिकांचे कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा पराभव आहे.
मुजुमदार, जाधव आणि पवार यांनी मनोगत व्यक्त केले. देसाई यांनी प्रास्ताविक केले.
माध्यमांची ताकद अशी असते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांची ‘सीएनएन’ने बातमी केली होती. या बातम्यांमुळे अमेरिकेचा अपमान होत असून अमेरिकेची प्रतिमा बाहेरच्या जगात खराब होत आहे, अशी टीका ट्रम्प यांनी केली होती. त्यावर ‘अमेरिकेची प्रतिमा जपणं हे आमचं नाही, तुमचं काम आहे. तुम्हाला प्रश्न विचारणं हे आमच काम आहे’, असे उत्तर सीएनएनने दिले. या उत्तराचे पत्र सीएनएनने संकेतस्थळावर टाकले. त्यावर सीएनएनच्या वार्ताहराला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. ‘त्यांनी असा निर्णय घेतला असेल तर आम्ही त्याच्याशिवाय काम करू. ही खऱ्या लोकशाहीची ताकद आहे’, असे उत्तर देत सीएनएनने माध्यमांची ताकद काय असते याचे दर्शन घडविले, असे गिरीश कुबेर यांनी सांगितले.
‘साहित्य शिवार’ दिवाळी अंकातर्फे ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत गोविंदराव तळवलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य भाऊसाहेब जाधव, गिरीश कुबेर, डॉ. शां. ब. मुजुमदार, जयराम देसाई आणि उल्हास पवार यांनी तळवलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.