नायजेरियन फ्रॉडमध्ये नागरिकांचे बेकायदेशीरपणे हस्तांतर केलेले पैसे नायजेरियन व्यक्तींना पोहोचविणाऱ्या मध्यस्थाला सायबर शाखेने अटक केली आहे. या प्रकरणात फसवणूक केलेल्या नागरिकांची एक कोटींपेक्षा जास्त रक्कम नायजेरियन व्यक्तींना आरोपींनी दिल्याचे समोर आले आहे.  आरोपीला न्यायालयाने तीन ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
शिवम वीरेंद्र श्रीवास्तव (वय ३२, रा. गोरेगाव, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी जावेद खालीद सय्यद, जगदीश रत्नेश नागर या दोघांना पूर्वीच अटक केली आहे. याबाबत सत्यजित जयसिंग हरेर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलोपार्जित संपत्ती भारतात गुंतवायची असल्याचे सांगून आरोपीने हरेर यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडील युरो चलन भारतीय चलनात हस्तांतरित करायचे असल्याचे सांगून त्यासाठी आठ लाख रुपये देण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने आणखी पैशाची मागणी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी हरेर यांनी सायबर शाखेकडे तक्रार केली. सायबर शाखेने या गुन्ह्य़ाचा तपास सुरू केला असता याची व्याप्ती मोठी असल्याचे दिसून आले. यापूर्वी अटक केलेल्या आरोपीकडे बँकेची वीस ते चोवीस बनावट खाती असल्याचे आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून श्रीवास्तवच्या मागावर पोलीस होते. फसवणूक करून जमा झालेले पैसे नायजेरियन व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे काम श्रीवास्तव करत होता. त्याने आतापर्यंत एक कोटी रुपये नायजेरियन व्यक्तींपर्यंत पोहोचविल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर करत आहेत.

Story img Loader