मृतदेह समोर नसताना किंवा मृताच्या आजाराविषयीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसतानाही मृत्यूच्या कारणाचा अंदाज बांधता येतो आणि अशा रितीने करण्यात आलेले नोंदीकरण त्या-त्या भागात होणाऱ्या मृत्यूंच्या कारणांबाबत कल्पना येण्यासाठी उपयुक्तही ठरते याचे एक सकारात्मक उदाहरण समोर आले आहे.
वैद्यकीय शवविच्छेदन (मेडिकल ऑटोप्सी) ही मृत्यूचे कारण ठरवण्याची योग्य पद्धत असली तरी प्रत्येक मृत्यूनंतर शवविच्छेदन करणे शक्य नसते. अशा वेळी मृतांच्या नातेवाईकांशी तोंडी प्रश्नोत्तरे करून (व्हर्बल ऑटोप्सी) मृत्यूचे कारण ठरवणे शक्य आहे हे एका अभ्यासाद्वारे स्पष्ट झाले आहे. ‘व्हर्बल ऑटोप्सी’चा वापर करून ‘द इनडेप्थ नेटवर्क’ या संस्थेतर्फे १३ देशांमध्ये झालेल्या एकूण १ लाख १० हजार मृत्यूंच्या कारणांचे नोंदीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नोंदींमध्ये पुण्यातील वढू गावातील ७६० मृत्यूंच्या नोंदींचा समावेश आहे.
केईएम रुग्णालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत वढू गावातील मृत्यूंच्या नोंदी करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. संजय जुवेकर म्हणाले, ‘‘रुग्णाच्या मृत्यूबद्दल संशय असेल तर किंवा अपघाती मृत्यूंमध्ये शवविच्छेदन केले जाते. ज्या प्रकरणांत शवविच्छेदन करणे शक्य नसते त्या मृत्यूंच्या कारणांची नोंदणी करण्यासाठी ‘व्हर्बल ऑटोप्सी’ हे साधन आहे. ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च’नेही (आयसीएमआर) ‘व्हर्बल ऑटोप्सी’ पद्धतीला मान्यता दिली आहे. या पद्धतीत मृताच्या जवळच्या व्यक्तींना विविध प्रश्न विचारले जातात आणि त्या उत्तरांच्या आधारे मृत्यूच्या कारणावर शिक्कामोर्तब केले जाते. आम्ही वढू येथील काही रहिवाशांना ‘व्हर्बल ऑटोप्सी’चे प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांकडून प्रश्नांची उत्तरे मिळवल्यानंतर त्याची तपासणी करून प्रत्यक्ष मृत्यूचे कारण निश्चित करण्याचे काम डॉक्टर करतात. डॉक्टरांना काही शंका असल्यास ते ‘व्हर्बल ऑटोप्सी’ करणाऱ्याला मृताच्या नातेवाईकांना पुन्हा काही प्रश्नांची उत्तरे विचारायला सांगतात.’’
वढूच्या आसपास २२ गावे आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत या गावांमध्ये दर सहा महिन्यांनी जाऊन जन्म, मृत्यू, स्थलांतर आणि विवाह या चार गोष्टींची माहिती घेतली जाते. त्यावरून त्या गावांमधील लोकसंख्यात्मक बदल समोर येतात. ‘गेल्या १० वर्षांत वढूमध्ये सुमारे ३ हजार मृतांच्या मृत्यूच्या कारणांचे या पद्धतीद्वारे नोंदीकरण करण्यात आले आहे. नगर रस्ता भागात होणाऱ्या अपघातांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या लक्षणीय असल्याचे या ‘व्हर्बल ऑटोप्सी’ पद्धतीवरून अधोरेखित झाले आहे,’ असेही डॉ. जुवेकर यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा