प्रत्येक जिल्ह्य़ात ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या (सार्वजनिक-खासगी क्षेत्राची भागीदारी) माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा राज्य सरकारचा मनोदय असून त्यात गुंतवणुकीसाठी मंदिर ट्रस्टना प्राधान्य दिले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ससून रुग्णालयात ‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट’तर्फे सुरू करण्यात आलेला स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या नूतनीकृत कक्षाचे, तसेच रुग्णांच्या नातेवाइकांसाठीच्या विश्रांतीगृहाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे, गृह व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राम शिंदे, खासदार अनिल शिरोळे, महापौर दत्तात्रय धनकवडे, बी. जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, विश्वस्त अप्पासाहेब सूर्यवंशी या वेळी उपस्थित होते.
मंदिरे केवळ कर्मकांडाची केंद्रे ठरु नयेत, ती लोकप्रबोधन, लोकचळवळ आणि लोकविकासाची केंद्रे ठरावीत, अशी अपेक्षा असून मंदिर ट्रस्टकडे जमा झालेला पैसा समाजालाच परत करण्याचे काम अनुकरणीय आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यात डॉक्टरांची संख्या वाढवावी लागेल, तसेच डॉक्टर झाल्यावर किमान १ ते २ वर्षे ग्रामीण भागात सेवा देण्याची मानसिकता तयार करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्य़ात एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा राज्य सरकारचा मनोदय आहे. परंतु नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडण्यासाठी लागणारा निधी मोठा आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा अशा अनेक राज्यांनी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’मधून वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली आहेत. याच प्रकारे वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यात गुंतवणुकीसाठी मंदिर ट्रस्टना प्राधान्य दिले जाईल.’
राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालयांशी जोडलेल्या रुग्णालयांमध्ये एक रुग्ण व त्याच्या नातेवाइकाच्या जेवणाची व्यवस्था मंडळांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे तावडे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘ससून रुग्णालयात कर्करोगासाठी कक्ष नाही. आधीच्या सरकारच्या काळात पाच एकर जमीन टाटा कॅन्सर रुग्णालयास मोबदला न घेता दिली होती. टाटाबरोबर ‘पीपीपी’ तत्त्वावर करार करुन ससूनमध्ये कर्करोगाचे युनिट सुरू करण्यासाठी पावले टाकली आहेत. ‘एमएसआरडीसी’ची जमीन उपलब्ध झाल्यास ससूनच्या प्रांगणात हे युनिट उभे राहू शकेल. येत्या काळात ‘मार्ड’ संघटनेच्या निवासी डॉक्टरांना संप करावा लागू नये म्हणून व्यवस्था केल्या जातील, परंतु त्या बदल्यात निवासी डॉक्टरांकडूनही काही अपेक्षा असतील.’

Story img Loader