लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालय विक्रीच्या आमिषाने दोन कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारवाड परिसरातून एकास अटक करण्यात आली.
याप्रकरणी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडीकल कॉलेज अँड रिसर्च सेंटरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संजोग महादेव देशमुख (रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचे वडील महादेव रामचंद्र देशमुख, लक्ष्मण यंकप्पा आरमाणी, दिलीप सदाशिव चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात वकील ॲड. विजयसिंह पाटील यांच्यामार्फत तक्रार दाखल केली होती.
आणखी वाचा-क्रांतिवीर चापेकर बंधुंचे स्मारक देशवासीयांसाठी प्रेरणास्थळ, राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
कर्नाटकातील वैद्यकीय महाविद्यालयाची विक्री करत असल्याचे आमिष दाखवून संजोग देशमुख, तसेच साथीदारांनी तक्रारदाराची दोन कोटी २१ लाख रुपयांची फसवणूक केली होती. देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे-कर्जतकर यांनी युक्तिवादात केली होती. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. पी. शेळके यांनी त्याला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
दरम्यान, याप्रकरणातील आरोपी महादेव देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. महादेव देशमुख कारागृहात आहे. करोना संसर्गात शैक्षणिक संकुल आर्थिक अडचणीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे, अशी बतावणी करण्यात आली होती.