देशातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या वाढत्या शुल्कामुळे ‘एमबीबीएस’ करण्यासाठी रशिया आणि चीनचा रस्ता धरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांत प्रादेशिक शिक्षण सल्लागारांच्या मध्यस्थीने रशियाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १५ ते ३५ टक्क्य़ांनी वाढली आहे. तर गेल्या वर्षी तब्बल आठ हजार भारतीय विद्यार्थ्यांनी चीनमध्ये एमबीबीएससाठी प्रवेश घेतला आहे.
यंदा ‘नीट’चा (नॅशनल एन्ट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट) निकाल निराशाजनक लागल्यामुळे डॉक्टरकीसाठी परदेशवारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता शिक्षण सल्लागारांनी वर्तवली आहे. नीट ला देशाभरातून एकूण ६,५८,०४० विद्यार्थी बसले होते. यात महाराष्ट्रातील ९६,५४६ विद्यार्थ्यांचा समावेश होता. राज्यातून परीक्षेला बसलेल्यांपैकी केवळ ३३,९६४ विद्यार्थीच वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले, तर इतर राज्यांतून बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकी सुमारे पन्नास टक्के विद्यार्थी पात्र ठरू शकले.
कोणत्याही प्रवेश परीक्षेशिवाय प्रवेश, महाविद्यालयाच्या शुल्काव्यतिरिक्त ‘डोनेशन’ किंवा ‘कॅपिटेशन फी’ भरावी न लागणे, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि मुख्य म्हणजे अठरा ते तेवीस लाखांत सुमारे पाच ते सहा वर्षांचा वैद्यकीय अभ्यासक्रम पार पडणे, या गोष्टींमुळे डॉक्टर होऊ इच्छिणारे विद्यार्थी रशिया आणि चीनकडे देशातील खासगी महाविद्यालयांना पर्याय म्हणून पाहू लागले आहेत. गेली ३२ वर्षे भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी रशियाला जात आहेत. तर चीनमधील वैद्यकीय शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांसाठी २००४ सालापासून खुला झाला आहे. या दोन देशांव्यतिरिक्त त्यातल्या त्यात स्वस्तात परदेशी शिक्षणासाठी युक्रेन, बेलारूस आणि फिलिपीन्सचाही विचार होत आहे.
देशातील खासगी महाविद्यालयांचे शुल्क भरमसाठ आहे. काही खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसचे शुल्क प्रतिवर्षी सुमारे सात लाख रुपयांची पातळीही ओलांडते. ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’ चे डॉ. अमित कांबळे यांनी सांगितले, ‘‘सध्याच्या आकडेवारीनुसार महाविद्यालयीन शुल्क, वसतिगृह शुल्क, वैद्यकीय विमा शुल्क असे खर्च जमेस धरता रशियात शिकणाऱ्या प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांस सुमारे तीन ते सव्वातीन लाख रुपये वार्षिक खर्च येतो. या हिशेबाने सहा वर्षांचे शिक्षण सुमारे अठरा लाखांत पूर्ण होऊ शकते. देशातील खासगी महाविद्यालयांच्या तुलनेत हे शुल्क कमी आहे.’
चीनमध्ये पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी सुमारे सुमारे तेवीस लाख रुपयांपासून खर्च येतो. या खर्चात त्या देशातील सर्व खर्च तसेच दरवर्षी सुटीसाठी भारतात येऊन परत जाणे याचाही समावेश असतो, अशी माहिती ‘न्यू सेंच्युरी एज्युकेशन’ या सल्लागार संस्थेतर्फे देण्यात आली. संस्थेचे अक्षय नारखेडे म्हणाले, ‘‘सध्या एकूण चाळीस हजार भारतीय विद्यार्थी चीनमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत आहेत. चीनमधील संस्कृती आणि हवामान भारताशी काही प्रमाणात मिळतेजुळती आहे. चीनच्या ‘मँडरिन’ या भाषेतून शिक्षण न घ्यावे लागता ते इंग्रजीतून घेता येणे, प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले जाणे, या कारणांमुळे विद्यार्थी चीनमध्ये शिकण्यास उत्सुक दिसतात.’’     
भारत आणि रशियाच्या सलोख्याच्या संबंधांमुळे तेथे राहणे विद्यार्थाना सुरक्षित वाटत असल्याचे मत ‘ग्लोबल एज्युकेशनल कन्सल्टन्सी’चे डॉ. सुहास माने यांनी व्यक्त केले. रशियातील वैद्यकीय महाविद्यालये सरकारी असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राहात असल्याचे ते म्हणाले.
रशियातील ‘स्मोलेंक्स स्टेट मेडिकल अ‍ॅकॅडमी’त शिक्षण घेणारी सायली वैद्य म्हणाली, ‘‘रशियातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि शिस्त चांगली आहे. शिकवलेल्या अभ्यासक्रमावर दर आठवडय़ाला घेतल्या जाणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण होणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असते.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा