विद्यापीठातील पश्चिम विभागीय सहसुविधा केंद्राचा पुढाकार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या पश्चिम विभागीय सहसुविधा केंद्रात औषधी वनस्पतींच्या संग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या संग्रहालयात दीडशे औषधी वनस्पतींचे नमुने, बियाणे उपलब्ध असून, संग्रहालयाच्या माध्यमातून वनस्पतींबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाची देशभरात सात सहसुविधा केंद्रे आहेत. त्यातील एक केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आहे. या केंद्राची आढावा बैठक नुकतीच झाली. त्यानंतर या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. जयपूरच्या राष्ट्रीय आयुर्वेद संस्थान येथील अधिष्ठाता प्रा. मीता कोटेचा, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अविनाश आडे, विभागीय केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. दिगंबर मोकाट आदी या वेळी उपस्थित होते.
संग्रहालयाविषयी डॉ. मोकाट यांनी माहिती दिली. संग्रहालयाचे स्वरूप छोटेखानी आहे. मात्र या संग्रहालयातील वनस्पतींचे औषधात वापरले जाणारे भाग, बियाणे नागरिकांना हातात घेऊन पाहता येतील, अशा अनोख्या संकल्पनेचे हे औषधी वनस्पतींचे संग्रहालय आहे. एकूण दीडशे वनस्पतींचे नमुने आणि औषधांमध्ये वापरले जाणारे वनस्पतींचे भाग, उदाहरणार्थ पाने, फुले, बी, मुळे, खोडाच्या साली, िडक, सुगंधी तेले आदींचा समावेश आहे. औषधी वनस्पतींच्या ७ हजार २०० प्रजाती आहेत. त्यातील बाराशे प्रजाती व्यापारासाठी वापरल्या जातात. या औषधी वनस्पतींच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करणारी पुस्तकेही उपलब्ध होतील.
औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या निवडक प्रगतिशील शेतकऱ्यांचा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते औषधी किसान सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. अश्वगंधा उत्पादक जनकीलाल जाट, तुळस उत्पादक हेमंत पटेल, सफेद मुसळी उत्पादक विनायक येऊल व जयेश मोकाशी, चंदन उत्पादक राजेंद्र गाडेकर, सामूहिक शेतीचे प्रोत्साहक सुभाष थोरात आदींचा या वेळी सन्मान करण्यात आला.