लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : महापालिकेच्या वायसीएम, नवीन थेरगाव, आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन भोसरी या पाच रुग्णालयांच्या परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता स्वस्त दरामध्ये रुग्णालय परिसरातच औषधे मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेचे ३२ दवाखाने आणि आठ मोठी रुग्णालये आहेत. संत तुकारामनगर येथे महापालिकेचे ७५० खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. पुणे जिल्ह्यातील नागरिक उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात येतात. अनेकदा रुग्णांना आवश्यक असणारी औषधे महापालिका रुग्णालयात उपलब्ध नसतात. त्यामुळे नाइलाजाने खासगी दुकानामधून औषधे आणावी लागतात. औषधे महागडी असतात. त्यामुळे महापालिकेच्या पाच रुग्णालय परिसरात जेनेरिक औषधांची दुकाने सुरू केली जाणार आहेत.
आणखी वाचा-अजब कारभार…आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या खासगी कार्यालयात दिमतीला सरकारी कर्मचारी ?
नॅकोफ इंडिया लिमिटेड या कंपनीला महापालिका रुग्णालय परिसरात अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर जेनेरिक औषधांचे दुकान सुरू करण्यासाठी थेट पद्धतीने भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देणार आहे. कंपनीला १५० ते १८६ चौरस फूट क्षेत्रफळाचे पाच गाळे दरमहा ३२ हजार २४२ रुपये भाडेदराने दहा वर्षांसाठी देण्यात आले आहेत.
‘आयुष्मान भव’ला मुदतवाढ
केंद्र शासनाच्या आयुष्मान भव मोहिमेंतर्गत शहरातील १८ वर्षे व त्यावरील सर्व पुरुषांची आरोग्य तपासणी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह सर्व रुणालये व दवाखान्यांत मोफत करण्यात येतात. बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) सर्व केस पेपर, औषधोपचार व तपासण्या विनामूल्य करण्यात येत आहेत. याची मुदत १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ अशी होती. मुदत संपल्याने ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.