‘पोलीस दलातील महिलांबद्दलही पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मित्रत्वाच्या भावनेचा अभाव दिसतो. पोलिसांनी लिंगभावाबद्दल संवेदनाक्षम व्हावे यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे,’ असे मत राज्याच्या कारागृह विभागाच्या पोलीस महानिरीक्षक व अतिरिक्त पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.
पुणे स्त्री आरोग्य व प्रसूतीशास्त्र संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ‘महिलांविषयी बोलू काही’ या चर्चासत्राचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी बोरवणकर बोलत होत्या. विधी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. जया सागडे, स्त्रीरोगतज्ज्ञ व कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर, संघटनेचे महासचिव डॉ. मनीष माचवे या वेळी उपस्थित होते.
आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जयश्री बेडेकर, स्मिता गोडबोले आणि डॉ. वर्षां डांगे यांचा या वेळी बोरवणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बोरवणकर यांनी सांगितले, ‘‘पोलिसांना आकडे व ‘पेपरवर्क’ची भीती वाटते. पोलीस दलातील भ्रष्टाचाराचाही प्रश्न मोठा आहे. नागरिकांना चांगली वागणूक न देणे, तक्रार दाखल करून न घेणे यासाठी या गोष्टी कारणीभूत असू शकतील. महिला आणि पुरुषांबद्दलही पोलीस असंवेदनाक्षम असल्याचे दिसून येते. त्यांना संवेदनाक्षम बनवण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे.’’
कोणत्याही प्रकारच्या अन्यायाबद्दल महिलांनी पोलिसात तक्रार करावी व पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यास तुमच्या ओळखीच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधावा, असेही बोरवणकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या,‘‘छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये मुली बोलल्या पाहिजेत. ‘थोडी छेडछाड झाली तर काय झाले, तू तुझ्या येण्या-जाण्याच्या वेळा बदल,’ असा नकारात्मक संदेश मुलींना दिला जातो. पण अशा प्रकरणांमध्ये वेळेवर पोलिसांची मदत घेतली तर प्रकरणे मोठी होण्यापासून रोखता येऊ शकेल. पोलिसात तक्रार अर्ज दिल्यावर त्याची पोचपावती घ्यावी आणि गुन्हा दाखल करून घेण्याचा आग्रह धरावा. एफआयआरची प्रत तक्रारदाराला मिळणे हाही त्याचा अधिकार आहे.’’
सागडे म्हणाल्या, ‘‘अन्याय घडताना बघून त्याची चीड येऊन तो थांबवावा असे आपल्याला वाटत नाही इतका समाज मृत झाला आहे. संसदेत कायदे करणाऱ्यांना लिंगभावाबद्दलची संवेदनक्षमता नाही. स्त्रियांवर अन्याय करणारे, पुरुषांच्या बाजूचे कायदे आजही होत आहेत. कायदे करणारे, कायद्याचा अन्वयार्थ लावणारे आणि त्यांची अंमलबजावणी करणारे या तिन्ही यंत्रणांना लिंगभावाबद्दल संवेदनाक्षम बनवायला हवे.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा