सार्वजनिक काका यांनी १४६ वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या पुणे सार्वजनिक सभा या संस्थेचे अध्यक्षपद प्रथमच महिलेकडे आले आहे. माजी नगरसेविका मीराताई पावगी यांची सभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी २ एप्रिल १८७० रोजी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. औंध संस्थानचे श्रीमंत श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, ल. ब. भोपटकर, कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, दा. वि. गोखले, विष्णू मोरेश्वर भिडे, गणपतराव नलावडे, र. बा. फडके, पोपटलाल शहा, अॅड. पुरुषोत्तम डावरे, पुरुषोत्तम गणेश मोडक, अरिवद आळेकर अशा मान्यवरांनी यापूर्वी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये संस्थेच्या अध्यक्षपदी मीरा पावगी यांची निवड करण्यात आली. त्यामुळे १४६ वर्षांच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलेला अध्यक्षपदाचा बहुमान लाभला आहे. संस्थेतर्फे होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहाय्य, योगासन-प्राणायाम वर्ग, ग्रंथालय, संस्कार वर्ग असे विविध उपक्रम राबविण्यात येतात. सार्वजनिक काका, न्या. म. गो. रानडे, महर्षी अण्णासाहेब पटवर्धन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते.
जनसंघाच्या कार्यामध्ये सहभाग घेणाऱ्या मीरा पावगी या १९९२ ते १९९७ या कालावधीत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका होत्या. त्यांच्याच कालखंडात बाजीराव रस्त्यावर सार्वजनिक काका यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला. कॉसमॉस बँकेच्या संचालक म्हणून दोन दशके त्यांनी काम पाहिले. पुणे मराठी ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळावर १५ वर्षे काम केलेल्या पावगी या महाराष्ट्र चित्पावन संघाच्या अध्यक्षा होत्या.
सभेच्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (२ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या वार्षिक स्नेहमेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्यां जयश्री काळे यांच्या हस्ते गरवारे बालभवनच्या संचालिका शोभा भागवत यांना यंदाचा ‘रमा माधव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा मीरा पावगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, असे कार्याध्यक्ष बा. बा. कुलकर्णी यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाला संघटित करण्याच्या उद्देशातून सार्वजनिक काका यांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. एक प्रदीर्घ परंपरा असलेल्या आणि समाजातील अनेक मान्यवरांनी योगदान दिलेल्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचा आनंद आहे.
– मीराताई पावगी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meera pavagi elected as president of pune sarvajanik sabha