पुणे : शनिवारवाडा परिसरातील पुण्येश्वर मंदिर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरात उत्खनन करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, पुण्येश्वर मंदिराच्या जागेवर उभारण्यात आलेल्या दर्ग्याच्या प्रस्तावित बांधकामास परवानगी देण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार देत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
शिंदे म्हणाले, पुण्येश्वर मंदिर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्ग्याची उभारणी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर त्याजागी असलेले मंदिराचे अवशेष नष्ट करण्यात आले आहेत. या ठिकाणी उत्खनन करण्यास परवानगी दिली तर इतिहासाच्या पैलूंवर नवा प्रकाश पडेल. यासंदर्भात राज्याच्या पुरातत्व विभागाचा अहवाल अनुकूल आहे.
येथे उत्खनन करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली ही वस्तुस्थिती आहे. मात्र, मी शिवसेनेमध्ये प्रवेश करतो असा काढण्यात आलेला अर्थ योग्य नाही. मी मनसेमध्ये आहे. कसब्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याबद्दल मनसेतून करण्यात आलेल्या हकालपट्टीवाबत भाष्य करताना शिंदे म्हणाले, हे सर्व सध्या पक्षामध्ये सक्रीय नव्हते. पक्षविरोधात केलेल्या कारवाईबद्दल झालेली कार्यवाही योग्यच आहे.